Fri, Dec 13, 2019 00:19होमपेज › Solapur › बार्शीकरमुळे जगभर पसरतोय ‘वर्दीतला माणूस’

बार्शीकरमुळे जगभर पसरतोय ‘वर्दीतला माणूस’

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 10:09PM

बुकमार्क करा

बार्शी : गणेश गोडसे

 ‘बार्शी तिथं सरशी’ हे आपण नेहमीच ऐकतो किंवा बार्शीचा अभिमान बाळगत ते जगभरात सांगतो. मात्र या वाक्याची वारंवार  प्रचिती सर्वांनाच नियमित येत असते. आताही गत काही दिवसांपासून सोशल मीडियाबरोबरच इंटरनेटवर धुमाकूळ घालून अनेकांना भुरळ घालणार्‍या ‘वर्दीतल्या दर्दी गायकाच्या’ आपण प्रेमात पडलो. पोलिस हवालदार संघपाल तायडेंच्या गायकीला विविध स्तरांमधून भरभरून दाद मिळालेली आहे. मात्र या संघपाल तायडे यांना जगासमोर सादर करण्याचे तसेच लोकांसमोर आणण्याचे काम बार्शी पोलिस दलातील पोलिस हवालदार अभिजित मुळे यांनी केले आहे. 
संघपाल तायडे यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियावर गप्पा मारत असताना बार्शीच्या अभिजित मुळे  अभिजित मुळे यांनी ‘महाराष्ट्र पोलिस - वर्दीतला माणूस’ या फेसबुक पेजवरून वर्दीतल्या ‘सिक्रेट सुपरस्टार’चा व्हिडिओ जगभर व्हायरल केला होता. मुळे यांनी अपलोड केलेल्या या व्हिडिओला 16 लाख व्ह्यूव्ज मिळाले आहेत, तर 25 हजार लोकांनी तो व्हिडिओ शेअर केला असल्याचे समोर आले आहे. त्यानंतरच मीडियात जळगावचा सिंगर पोलिस समोर आला. 
बार्शी पोलिस ठाण्यात सेवा बजावणारे अभिजित मुळे हे मुळचे कुर्डुवाडीचे. के.एन. भिसे महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केलेली आहे. 2007 मध्ये ते पोलिस दलात दाखल झाले. सध्या ते बार्शी ग्रामीण पोलिस दलात पोलिस नाईक या पदावर कार्यरत आहेत. योगायोगाने बार्शी ही त्यांची सासरवाडी असून ते बार्शीतील पोलिस कॉलनीत राहतात. पोलिस दलात भरती झाल्यापासून ते ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे आपली सेवा बजावत आहेत. पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या व्यक्‍तिमत्त्वाची छाप त्यांच्यावर आहे. प्रभू यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही पोलिस दलाचे काम निर्भीड, नि:पक्ष आणि प्रामाणिकपणे बजावत असल्याचे ते सांगतात. त्यामुळेच पोलिस दलावर होणारी टीका नेहमीच त्यांच्या काळजात रुतत असे. मात्र केवळ 2-3 टक्के पोलिसांमुळे अख्खे पोलिस खाते बदनाम होत असल्याची खंत त्यांना वाटते. पण पोलिसांनाही भावना आहेत, कुटुंब आहे, मित्रपरिवार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलिसही माणूसच आहेत. माणूस असलेल्या पोलिसांचे हे रूप त्यांना जगासमोर आणायचे होते. त्यांच्या या विचारातूनच फेसबुकवर ‘महाराष्ट्र पोलिस - वर्दीतला माणूस’ साकारण्यात आला. आपल्या सकारात्मक विचाराला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देत अभिजित यांनी ‘महाराष्ट्र पोलिस-वर्दीतला माणूस’ हे फेसबुक पेज सुरू केले. या पेजच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पोलिस वर्ग त्यांनी एकत्र जोडून घेतला तसेच मीडियातून नकारात्मक भूमिका दाखविणार्‍या पोलिस दलातील चांगल्या कार्याला त्यांनी या पेजच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ‘महाराष्ट्र पोलिस-वर्दीतला माणूस’ या फेसबुक पेजला आजमितीला 2.20 लाख लाईक्स आहेत, तर 2 लाख 28 हजार फॉलोअर्स आहेत.