Mon, Mar 25, 2019 09:50होमपेज › Solapur › पोलिसाचा प्रामाणिकपणा; दिसून आली वर्दीतली माणुसकी

पोलिसाचा प्रामाणिकपणा; दिसून आली वर्दीतली माणुसकी

Published On: Mar 19 2018 10:29PM | Last Updated: Mar 19 2018 9:38PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

पोलिसांकडे तिरकस नजरेने बघणार्‍या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा प्रकार पोलिस कर्मचार्‍याने आपल्या कृतीतून करून दाखवला असून पैशाचे सापडलेले पाकीट  पोलिस कर्मचार्‍याने परत करून आपल्या प्रामाणिकपणाचा दाखला दिला आहे.

खांडवी (ता. बार्शी) येथील पोलिस औट पोस्टचे पोलिस नाईक तथा प्रशिक्षक सचिन माने (रा. बार्शी) असे प्रामाणिकपणा दाखवलेल्या पोलिस कर्मचार्‍याचे नाव असून माने यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल जिल्हा पोलिसप्रमुख वीरेश प्रभू यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. माने हे 19 मार्च सोमवारी सोलापूर येथील सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत सहभागी आहेत. आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास माने यांना पंढरपूर येथून पोलिस भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मैदानावर  आलेल्या तानाजी हणुमंत शिनगारे या उमेदवार तरुणाचे पाकीट मैदानावर मिळून आले. त्यांनी हे पाकीट पाहिले असता पाकीटमध्ये रोख पाच हजार रुपये,  एटीएम कार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड  आदी महत्त्वाचे दस्तऐवज दिसून आले. माने यांनी तातडीने संबंधित ओळखपत्र व आपल्या संपर्कातून संबंधित तरुणाचा शोध घेऊन शिनगारे या युवकाशी संपर्क साधत हे पाकीट सुपूर्द केले. या प्रामाणिकपणाबद्दल प्रभू यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.