Tue, Apr 23, 2019 13:33होमपेज › Solapur › बार्शी-लातूर रस्त्यावर कारवर झाड पडले

बार्शी-लातूर रस्त्यावर कारवर झाड पडले

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:50PM

बुकमार्क करा


बार्शी : तालुका प्रतिनिधी  

लग्नकार्यासाठी निघालेल्या  कारवर चिंचेचे भलेमोठे झाड कोसळून दुर्घटना घडली. या अपघातात कारमधील चारही तरुण सुखरुप असून किरकोळ जखमी झाले आहेत. बार्शी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचे घटनास्थळावरुन सांगण्यात आले.

ही घटना शनिवारी दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास बार्शी-लातूर राज्यमार्गावर पांगरी शहरापासून जवळच असलेल्या नीलकंठेश्‍वर मंदिराजवळ घडली.  वृक्ष कोसळल्याने पुणे-लातूर राज्यमार्गावरील वाहतूक 2 तास खंडित झाली होती. नितीन  आडाळे (वय 35), महेश मारणे (वय 36), अंकुश गुंड (वय 39) व अमोल  उभे (वय 38, सर्व रा. कोथरूड, पुणे) अशी या घटनेत सुखरूप सुटलेल्या पुणे येथील तरूणांची नावे आहेत. 

पुणे येथील कोथरूड भागातील चार तरूण (एम.एच. 12 एन.यु. 1371) कारमधून पुणे येथून कळंब तालुक्यातील साखर कारखान्यावर असलेल्या नातेवाईकांच्या एका लग्नकार्यासाठी बार्शी-पांगरी-येडशीमार्गे कळंबकडे जात होते. दरम्यान ते पांगरीनजिक असलेल्या नीलकंठेश्‍वर मंदिरानजिक आले असता  अचानक त्यांच्या चालू कार गाडीवर जुनाट चिंचेचा मोठा वृक्ष कोसळला.त्यामुळे क्षणार्धात कारगाडी चिंचेच्या मोठ्या फांद्या व बुंध्याखाली झाकली गेली. काय घडतेय, हे कळायच्या आत गाडी पाल्यामध्ये झाकली गेली.चिंचेखाली गाडी पाल्यात पूर्णपणे अडकली होती.

अचानक चिंचेचे झाड राज्यमार्गावर कोसळल्याने चिंचेच्या झाडाखाली काही आहे का, याचा शोध घेतला असता चक्क कारगाडी चिंचेखाली अडकली असल्याचे लोकांच्या व प्रवाशांच्या लक्षात आले. पांगरी, चिंचोली, ढेंबरेवाडी येथील आदी गावांसह पांगरी पंचक्रोशीमधील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. चारही तरूण प्रयत्नांची पराकाष्ठा करून सुखरूप गाडीबाहेर आले. 

गाडीतील सर्वजण सहीसलामत बाहेर आल्यानंतर उपस्थितांना धीर आला. झाड पुणे-लातूर राज्यमार्गावर आडवे पडल्यामुळे रस्ता पूर्ण झाकोळून गेला होता. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या दोन-दोन किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. दुर्घटनेस कारणीभूत  अधिकार्‍यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याबाबत घटनास्थळी चर्चा होत होती. अद्याप पांगरी पोलिसांत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांनी किमान यापुढेतरी धोकादायक झाडे काढून घ्यावीत,  अशी वाहनधारकांची मागणी आहे.