Tue, Jul 16, 2019 22:31होमपेज › Solapur › तिरंगी लढतीकडे तालुक्याचे लक्ष

तिरंगी लढतीकडे तालुक्याचे लक्ष

Published On: Jun 23 2018 10:57PM | Last Updated: Jun 23 2018 10:27PMबार्शी : गणेश गोडसे

आ. दिलीप सोपल, माजी आ. राजेंद्र राऊत व राजेंद्र मिरगणे या तिन्ही नेत्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची व प्रतिष्ठेची होत असलेल्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून तीन गटांत अटीतटीची तिरंगी लढत रंगणार आहे.

शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर प्रथमच बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडत असल्यामुळे या निवडणुकीस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीनंतर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची चावी मतदार कोणाच्या हातात देणार, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे. लक्षवेधी ठरणार्‍या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी गटाच्या 15 जागांसह व्यापारी, हमाल, तोलार गटाच्या मिळून 18 जागांसाठी लढत होणार आहे. 18 जागांसाठी 60  उमेदवार आपले नशीब आजमावताना दिसून येत आहे. आ. दिलीप सोपल हे ‘शेतकर्‍यांची बाजार समिती वाचवा आघाडी’च्या माध्यमातून शिट्टी हे चिन्ह घेऊन मतदारांसमोर जात आहेत. माजी आ. राजेंद्र राऊत हे बळीराजा विकास आघाडीच्या माध्यमातून ढाल-तलवार हे चिन्ह घेऊन, तर राजेंद्र मिरगणे हे बार्शी तालुका शेतकरी विकास आघाडीकडून कपबशी हे चिन्ह घेऊन मतदारांसमोर जात आहेत.

उमेदवारी अंतिम झाल्यानंतर ग्रामीण भागात खर्‍या अर्थाने निवडणुकीस सुरूवात झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. तिन्ही गटाच्या नेत्यांनी ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्यासह सर्वच गावे पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. शेतकरी मतदार झाल्यानंतर होणारी ही पहिलीच लढत असल्यामुळे शेतकरी आपले मतदान कोणाच्या पारड्यात टाकणार व कोणाचे पारडे रिकामे ठेवणार, हे आगामी काळात दिसून येणार आहे.