Tue, Jul 16, 2019 21:49होमपेज › Solapur › बार्शीत २६ जानेवारीला ग्रामसभांवर बहिष्काराचा निर्णय

बार्शीत २६ जानेवारीला ग्रामसभांवर बहिष्काराचा निर्णय

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 11:05PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

 प्रजासत्ताक दिन, 1 मे, स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधी जयंती यादिवशी गावागावात होणार्‍या विशेष ग्रामसभा घेणार नसून त्या ग्रामसभा ग्रामसेवकांच्या जीवावर बेतत असल्याचे लेखी पत्र बार्शी तालुका ग्रामसेवक युनियनने गटविकास अधिकार्‍यांना दिले आहे. 

गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, महत्त्वाच्या दिनाबरोबरच राष्ट्रीय सणाच्या दिवशी शासन  आदेशानुसार गावागावात विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र अशा राष्ट्रीय उत्सवांवेळी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे ग्रामसभेस ग्रामसेवक वगळता इतर संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नाहीत, हा आजवरचा अनुभव आहे. तसेच अशा ग्रामसभांना विशेष महत्त्व देण्यात आल्यामुळे दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग तसेच रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना दमदाटी करणे अंगावर धावून जाणे, जीवे मारण्याची धमकी देणे, बनावट पद्धतीने गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे आदी प्रकार घडत असतात. 

त्यामुळे अशा राष्ट्रीय उत्सवांवेळी ग्रामसभा न घेता त्या अन्य दिवशी घेण्यात याव्यात, ग्रामसभांच्या दिवशी पुरेसे पोलिस संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणीही युनियनने केली आहे. त्यामुळे या राज्य संघटनेच्या निर्णयाची अंमलबजावणी तालुका संघटनेने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 26 जानेवारीपासून याची अंमलबजावणी करावी अन्यथा प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिला आहे.  

प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा घेण्याच्या सूचना असल्या तरी यादिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने नियम असूनही ग्रामसभेला इतर शासकीय, निमशासकीय कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे ग्रामसभेचा मूळ उद्देश साध्य होत नसल्याने प्रजासत्ताक दिनी होणारी ग्रामसभा इतर दिवशी आयोजित करण्यात यावी. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिनी फक्‍त ध्वजारोहणाचे कार्यक्रम घेण्यात यावेत.