Wed, May 22, 2019 16:41होमपेज › Solapur › जामगाव येथे मतिमंद मुलीवर बलात्कार

जामगाव येथे मतिमंद मुलीवर बलात्कार

Published On: Feb 09 2018 10:55PM | Last Updated: Feb 09 2018 10:17PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

 अठरावर्षीय मतिमंद मुलीवर अनेक महिन्यांपासून बलात्कार करून तिला गर्भवती केले. हा प्रकार  कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना जामगाव (आ) (ता. बार्शी) येथे उघडकीस आली. याबाबत मुलीच्या आईने पांगरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या घराशेजारी राहणार्‍या 52 वर्षीय इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप  अभिमान वाघमारे (रा. जामगाव) असे त्याचे नाव आहे. 

पांगरी पोलिसांनी तातडीने  दिलीप वाघमारे यांना अटक करून बार्शी न्यायालयात उभे केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.   पीडितेच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे की, दिलीप वाघमारे व ते शेजारी रहाण्यास आहेत. ते दैनंदिन उदरनिर्वाहासाठी जात असतात. त्यांची 18 वर्षीय मतिमंद मुलगी ही वाघमारे यांच्याकडे टीव्ही बघण्यासाठी जात असे. दरम्यान, मतिमंद  असल्याचा व टीव्ही बघण्यासाठी घरी येत असल्याची संधी साधून तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. त्यातून ही मतिमंद मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिली आहे. पोटात दुखू लागल्यामुळे मुलीस बार्शी येथील खासगी रुग्णालयात  उपचारासाठी घेऊन गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलीने झालेला प्रकार पालकांना सांगितला. पीडितेवर सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात  उपचार सुरू आहेत. मतिमंद मुलीचा गैरफायदा घेऊन तिला टीव्ही दाखवण्याचे आमिष दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन वारंवार बळजबरीने तिच्या संमतीशिवाय बलात्कार केल्याप्रकरणी पांगरी पोलिसांत वाघमारे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार समोर  आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अधिक तपास स.पो.नि.धनंजय ढोणे हे करत आहेत.