Fri, Apr 26, 2019 18:04होमपेज › Solapur › पोलिस अधिकार्‍यांच्या घरावर दरोडा

पोलिस अधिकार्‍यांच्या घरावर दरोडा

Published On: Mar 08 2018 11:00PM | Last Updated: Mar 08 2018 9:42PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

पोलिस  अधिकार्‍यांच्या गावाकडील घरावर दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची खळबळजनक घटना तावडी (ता. बार्शी) येथे बुधवारी रात्री उशिरा घडली. दरोडेखोरांनी पोलिस अधिकार्‍याच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून घरातील वृद्धांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत 38 तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल हँडसेट, हातातील  घड्याळ  असा  आठ लाखांचा ऐवज लंपास केला.
 ही घटना तावडी येथे बुधवारी मध्यरात्री घडली. वासुदेव रामलिंग गादेकर (वय 68) यांनी याबाबत पांगरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. हा दरोडा पडल्यामुळे बार्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलिसप्रमुख वीरेश प्रभू, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे, स.पो.नि. धनंजय ढोणे, स.पो.नि. जयंत गादेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासासाठी यंत्रणा सज्ज केली.
मनोज गादेकर हे शिक्षक असून ते तावडी येथे राहण्यास आहेत, तर जयंत गादेकर हे सोलापूर ग्रामीण पोलिस विभागात वाहतूक शाखेत स.पो.नि. म्हणून, तर अण्णासाहेब गादेकर हे मुंबई येथील भायखळा येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत  आहेत. बुधवारी सायंकाळी घरातील सर्व नेहमीप्रमाणे जेवणखान उरकून झोपले. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मनोज गादेकर हे शेतात पिकास पाणी सोडण्यासाठी गेले.

 चोरट्यांनी घरातील दोघा वृद्ध पती-पत्नीस धमकावत मुलगा, सुना, नातू यांचे कपाटात ठेवलेले 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे सहा तोळे वजनाचे सोन्याचे पट्टीचे गंठण, 80 हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे एक नेकलेस, दहा हजार रुपये किमतीचे 5 ग्रॅम वजनाची फुले-झुबे, 90 हजार रुपये किमतीचे 4 तोळे 5 ग्रॅम वजनाचा तीन पदरी राणीहार, 80 हजार रुपये किमतीच्या 4 तोळे वजनाच्या ठोक्याच्या पाटल्या, 90 हजार रुपये किमतीचे 4 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 40 हजार रुपये किमतीचे 2 तोळे वजनाचे एक नेकलेस, 40 हजार रुपये किमतीचे 2 तोळे वजनाचे डिझाईनचे छोटे गंठण, 8 हजार रुपये किमतीची 4 ग्रॅम वजनाची  अंगठी, 40 हजार रुपये किमतीचे 2 तोळे वजनाचे सोन्याचे डिझाईनचे गंठण, 10 हजार रुपये किमतीचे 5 ग्रॅम वजनाचे कानातील वेल, 8 हजार रुपये किमतीची 4 ग्रॅमची  ठुशी, 50 हजार रुपये किमतीचे 2 तोळे 5 ग्रॅम वजनाचे एक लॉकेट, 30 हजार रुपये किमतीचे 1 तोळा 5 ग्रॅम वजनाचे लॉकेट व अंगठी, 20 हजार रुपये किमतीचे 1 तोळा वजनाचे एक मंगळसूत्र, 8 हजार रुपये किमतीचे 4 ग्रॅम वजनाचे कानातील फुले झुबे, 800 रुपये किमतीचे एक घड्याळ व 5 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल हँडसेट चोरट्यांनी चोरून नेला. अधिक तपास स.पो.नि. धनंजय ढोणे करत आहेत.