Tue, Mar 26, 2019 21:56होमपेज › Solapur › कारी येथे अ‍ॅपल बोरातून लाखोंचे उत्पादन

कारी येथे अ‍ॅपल बोरातून लाखोंचे उत्पादन

Published On: Dec 12 2017 2:11AM | Last Updated: Dec 11 2017 9:33PM

बुकमार्क करा

बार्शी : गणेश गोडसे

शेती म्हणजे तोट्याचा धंदा, शेती न परवडणारा व्यवसाय, शेती करणे म्हणजे कर्जबाजारी होणे अशी ओरड सतत शेतीबाबत होताना दिसते. मात्र, नवनवीन फळपिकांचा आधार घेऊन आर्थिक उत्पादनाचे स्त्रोत निर्माण केल्यास शेती ही नेहमीच फायद्याची ठरू शकते, हे दाखवून देण्याचा यशस्वी प्रयत्न कारी (ता. बार्शी) येथील तरुण शेतकर्‍याने करून दाखवला आहे. 

खासेराव विनायक विधाते या युवक शेतकर्‍याने रासायनिक खताची मात्रा न देता केवळ शेण व उसाची मळी याचाच वापर करून दैनंदिन फळपिकांना बाजूला सारून, अत्यल्प खर्च, फवारणी कमी, पाण्याची जेमतेम गरज हे हेरून अ‍ॅपल बोराचा आधार घेऊन  आपल्या मध्यम प्रतीच्या शेतात अ‍ॅपल बोराची लागवड करून एकरी चक्क साडेतीन लाख रुपयांपेक्षाही जास्त आर्थिक उत्पादन घेऊन शेतीबाबत  उदासिन असलेल्या शेतकर्‍यांसमोर  एक वेगळा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न केला आहे. 

  सधन शेतकरी अशी ओळख  असलेल्या खासेराव विधाते या तरुणाने तोट्यात सुरू असलेल्या फळपिकांचा अभ्यास करून त्यातून काय मार्ग काढावा, याचा अंदाज घेत मध्यम प्रतीच्या शेतामध्ये 35 रुपये प्रती रोप याप्रमाणे 16 बाय 16 अंतरावर 400 रोपांची मागणी करून दोन एकरात अ‍ॅपल बोराची जात लागवड केली. चालू आर्थिक वर्षात एकरी 3,50,000 लाख रुपयांचे निव्वळ उत्पादन मिळवण्यात यश आले आहे. 

विधाते यांनी जानेवारी 2015 मध्ये एकरी 200 अ‍ॅपल बोरांची लागवड केली. लागवड केल्यानंतर अल्पावधीतच म्हणजे अवघ्या सातव्या महिन्यातच अ‍ॅपल बोराची बाग बहरून गेली. पहिल्या वर्षी एकरी पाच टन अ‍ॅपल बोरामधून दीड लाख रुपयांचे  उत्पादन त्यांच्या हाती लागले होते. शेतीमालास दर मिळत नसल्याची ओरड होत असतानाच विधाते यांनी मात्र, आपल्या कौशल्याने एकरी जवळपास साडेतीन लाखांच्या पुढे उत्पादन घेऊन नाउमेद होत चाललेल्या कृषी उद्योगातील लोकांसमोर पर्याय सादर केला आहे. त्यांना 20 रूपयांपासून 48 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.

रोपांची किंमत अत्यल्प, फवारणी खर्च कमी, मजुरीची कमी आवश्यकता आदी बाबींमुळे अ‍ॅपल बोर शेतकरी बांधवांना किफायतशीर ठरत आहे. चार किटकनाशकाचे व तीन बुरशीनाशक अशा जेमतेम फवारण्या घेतल्या असता रोगराई आटोक्यात येते.

पाण्याची अत्यल्प गरज

अ‍ॅपल बोराच्या जातीसाठी पाण्याची फारशी गरज भासत नाही. जानेवारी ते जूनच्या दरम्यान आपल्या सोईने छाटणी केल्यानंतर पाणी देणे गरजेचे ठरते. त्यानंतर ठिबकच्या सहाय्याने प्रतिदिन साधारणतः दोन तास पाणीपुरवठा करणे फायदेशीर ठरते. दुष्काळी परिस्थिती उद्वल्यास पाण्याअभावी झाडे सुकत नाहीत. 

देशभरात बाजारपेठ

नागपूर, मुंबई, पुणे, बेंगलोर, कोल्हापूर, हैदराबाद, सोलापूर, नांदेड, निजामाबाद आदी महत्त्वाच्या शहरात अ‍ॅपल बोराला चांगली मागणी आहे.