Thu, Apr 25, 2019 04:14होमपेज › Solapur › व्यापारी गणातील दोन जागा ठरणार निर्णायक

व्यापारी गणातील दोन जागा ठरणार निर्णायक

Published On: Jul 05 2018 1:41AM | Last Updated: Jul 04 2018 9:21PMबार्शी : गणेश गोडसे 

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून विजेत्या राऊत गटाच्या कार्यकर्त्यांनी शहरासह ग्रामीण भागातील आपापल्या गावात, गल्लीत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. 18 जागांसाठी निवडणूक झाली होती. माजी आ. राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास आघाडीच्या उमेदवारांनी ग्रामीण भागातील शेतकरी मतदारसंघात 15 पैकी 9 जागा जिंकून यश मिळवले असून ते बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेपर्यंत जाऊन पोचले आहेत. सहकारी पक्षाच्या मदतीने राऊत गटाची सत्ता बार्शी बाजार समितीवर येण्याची चिन्हे आहेत. 

ग्रामीण भागातील शेतकरी गटातील निकाल खूपच धक्कादायक लागला असून सत्ताधारी आ. दिलीप सोपल यांच्या गटास सत्तेपासून दूर ठेवण्यात विरोधकांना यश आले आहे. आ. सोपल यांच्या गटाने सात जागांवर यश मिळवले आहे. मिरगणे गटाच्या व्यापारी गणातील विजयी दोन जागा निर्णायक ठरणार असून त्या दोन जागांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आजी-माजी आमदारांनी यश गृहित धरलेल्या जागांवर अनपेक्षित धक्के बसल्याचे जाहीर निकालावरून दिसून येत आहे. निकालानंतर सर्वच गटाकडून यश, अपयशाची कारणे शोधली जात आहेत. अपयशाचे खापर कोणावरतरी फोडले जाईल. मात्र हा निकाल सर्वांनाच आत्मपरीक्षण करावयास लावणारा आहे. 18 गणात पार पडलेल्या निवडणुकीत 61555 मतांपैकी 1125 मते अवैध ठरली आहेत. अवैध मतांचा फटका नेमका कोणाला बसला हे महत्त्वाचे ठरणार आहे.

  आगळगाव गणात भावकीतच झालेल्या रंगतदार लढतीत सोपल गटाच्या अभिमन्यू डमरे यांनी राऊत गटाचे गणेश डमरे यांचा जेमतेम 14 मतांनी पराभव केला. या गणात 47 मते अवैध ठरली. पांगरी गणात  एकाच गल्लीतील दोन उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत राऊत गटाच्या शालन गोडसे यांनी सोपल गटाच्या मंदाताई काळे यांचा 133 मतांनी पराभव केला. येथे 93 मते अवैध ठरली. लक्षवेधी ठरलेल्या उक्कडगाव गणात राऊत गटाच्या रावसाहेब मणगिरे यांनी सोपल गटाचे योगेश सोपल यांचा 403 मतांनी पराभव केला, तर 87 मते अवैध झाली. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या जामगाव (आ) गणात राऊत गटाचे रणवीर राऊत यांनी सोपल गटाच्या गणेश जाधव यांचा तब्बल 1215 मतांनी पराभव केला. तर 100 मते अवैध ठरली. उपळाई (ठोंगे) गणात सोपल गटाच्या अरूण येळे यांनी राऊत गटाचे शिवाजी हाके यांचा 157 मतांनी पराभव केला, तर येथे 62 मते अवैध ठरली. मळेगाव गणात सोपल गटाच्या आण्णासाहेब कोंढारे यांनी राऊत गटाचे भगवंत पाटील यांचा 176 मतांनी पराभव केला. येथे 91 मते अवैध ठरवण्यात आली.कारी गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी राऊत गटाचे दयानंद डोके यांचा 155 मतांनी पराभव केला. येथे 86 मते अवैध ठरवण्यात आली. उपळे दुमाला गणात सोपल गटाच्या अनिल जाधव यांनी राऊत गटाचे सचिन बुरगुटे यांचा अल्पशा 12 मतांनी पराभव केला. येथे 64 मते अवैध ठरवण्यात आली. घाणेगाव गणात राऊत गटाचे  झुंबर जाधव यांनी सोपल गटाचे नितीन मोरे यांचा 112 मतांनी पराभव केला. 66 मते अवैध झाली. पानगाव गणात सोपल गटाच्या प्रभावती काळे यांनी राऊत गटाच्या कुसूम काळे यांचा 360 मतांनी पराभव केला, तर 80 मते अवैध झाली. श्रीपतपिंपरी गणात राऊत गटाचे महादेव चोरघडे यांनी सोपल गटाचे गोवर्धन घाडगे यांचा 309 मतांनी पराभव केला, तर 82 मते अवैध ठरली. सुर्डी गणात राऊत गटाचे काशिनाथ शेळके यांनी सोपल गटाचे श्रीकांत मचाले यांचा 29 मतांनी पराभव केला. येथे 82 मते अवैध ठरवण्यात आली. 

सासुरे गणात राऊत गटाचे सचिन जगझाप यांनी सोपल गटाचे भागवत भोसले यांचा 206 मतांनी पराभव केला, तर 56 मते अवैध झाली. शेळगाव गणात राऊत गटाच्या वासुदेव गायकवाड यांनी सोपल गटाचे कपिल कोरके यांचा 69 मतांनी पराभव केला. राजेंद्र मिरगणे तिसर्‍या क्रमांकावर गेले. येथे 58 मते अवैध ठरवण्यात आली. भालगाव गणात राऊत गटाचे बुवासाहेब घोडके यांनी सोपल गटाचे सूरज काकडे यांचा 214 मतांनी पराभव केला. 58 मते अवैध ठरली. हमाल तोलार गटात सोपल गटाच्या चंद्रकांत मांजरे यांनी मिरगणे गटाचे शाम शिंदे यांचा 81 मतांनी पराभव केला. व्यापारी-आडत्या मतदारसंघात मिरगणे गटाच्या कुणाल घोलप व साहेबराव देशमुख यांनी रविकिरण कानगुडे व शिरीष गावसाने यांचा पराभव केला.