होमपेज › Solapur › जातीय दरी दूर झाल्याशिवाय प्रगती अशक्य : मिटकरी

जातीय दरी दूर झाल्याशिवाय प्रगती अशक्य : मिटकरी

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 10:10PM

बुकमार्क करा

बार्शी : तालुका प्रतिनिधी 

जातीय दरी दूर झाल्याशिवाय समाज व देश प्रगतीच्या दिशेने जाणार नसल्यामुळे अगोदर जाती-जातीमधील भेदभाव दूर करा, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अमोल मिटकरी यांनी केले.
बार्शी तालुका संभाजी ब्रिगेडच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक आ. दत्तात्रय सावंत होते. व्यासपीठावर दै. ‘पुढारी’चे न्यूज ब्युरो चिफ श्रीकांत साबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे, सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल  उस्मानाबादचे चेअरमन डॉ. दिग्गज दापके-देशमुख, तहसीलदार ऋषिकेत शेळके,  माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक सुनील शिखरे, गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, प्रशासन अधिकारी रावसाहेब मिरगणे, नर्मदेश्‍वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सखुबाई गडसिंग, अध्यक्ष विठ्ठल पिसाळ  आदी उपस्थित होते. 

यावेळी तुळशीदास जाधव प्रशाला (वैराग), जिजामाता कन्या व जिजामाता विद्यामंदिर (बार्शी) यांना आदर्श शाळा म्हणून सन्मानीत करण्यात आले. प्राथमिक शाळा विभागामधून सुुषमा अंधारे (उपळाई ठोंगे), शिवाजी कांदे (बेलगाव), माध्यमिक शालेय विभाग आनंद डुरे (वैराग), श्रीधर कांबळे, संजय पाटील  (बार्शी), किसन माने (चारे), उच्च महाविद्यालय विभाग मनोज गादेकर, एस.के. पाटील (बार्शी), तर विशेष पुरस्कार रंजित डिसले (परिते), चंद्रकांत पवार (अहमदनगर), सूर्यकांत चोरमरे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  

उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे यांनी आपला व संभाजी ब्रिगेडचा नजीकचा संबंध असल्याचे सांगत ही संघटना विधायक कामात अग्रेसर असल्याबद्दल संघटनेचे कौतुक केले. तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी संभाजी ब्रिगेड सामाजिक उपक्रम राबवून जनतेच्या विविध प्रश्‍नांवर आवाज  उठवत  असल्याचे सांगितले. 

 श्रीकांत साबळे यांनी विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांचे योगदान अमूल्य असून त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच  असल्याचे सांगितले. आनंद काशिद यांनी प्रास्ताविकात गुणवंत शिक्षक पुरस्कार आयोजनामागचा उद्देश स्पष्ट  करून शिक्षकांचा खूप मोठा प्रतिसाद लाभल्याचे सांगितले. 

जलयुक्‍त अभियानचे अधिकारी रवींद्र माने म्हणाले की, शिक्षकांबद्दल असलेली आदरयुक्‍त भीती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. प्रमोद भोंग यांनी यावेळी आपल्या भाषणामधून संभाजी ब्रिगेड ही शाहू, फुले, आंबेडकर व शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा कसा पुढे नेत आहे, असे सांगितले. यावेळी गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, प्रमोद भोंग, श्रीधर कांबळे यांनीही मनोगत व्यक्‍त केले. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.