Tue, Jul 16, 2019 01:35होमपेज › Solapur › तांबेवाडीत १२ वीचा पेपर व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल?

तांबेवाडीत १२ वीचा पेपर व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल?

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 22 2018 1:23AMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

तांबेवाडी (ता. बार्शी) येथील वसंत महाविद्यालयात घेण्यात आलेला बारावीचा पहिलाच पेपर व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झाल्याच्या प्रकारामुळे संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ  उडाली आहे. मात्र, या प्रकाराला गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी मात्र दुजोरा दिला नाही. दरम्यान, हा प्रकार  प्रसारमाध्यमांसमोर  आणणार्‍या तरुणाला मात्र काही काळ नजरकैदेत ठेवण्याचा प्रकार घडला असल्याचे वृत्त आहे. 

 बुधवारपासून महाराष्ट्रात  बारावी बोर्डाची परीक्षा सुरू झाली. पहिल्या दिवशी सकाळी 11 वाजता इंग्रजी विषयाचा पेपर सुरू झाल्यानंतर  अवघ्या एका तासातच प्रश्‍नपत्रिका बाहेरील झेरॉक्स केंद्रावर पोहोचली.त्यानंतर तिचा दर वाढत गेला. लोकांनी पैसे देऊन ही प्रश्‍नपत्रिका विकत घेऊन  उत्तरे पुरवण्याचा प्रयत्न केला.

बोर्डाकडून प्रश्‍नपत्रिका फुटणार नाही याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरण्यास सुरूवात केली असली तरी पुन्हा असा प्रकार घडल्यामुळे ढिसाळ कारभार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना पेपरला उपस्थित राहण्यासाठी वेळेचे बंधन घालणार्‍या बोर्डाकडून घडलेल्या हलगर्जीपणामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. 

कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटल्यामुळे शिक्षण विभागाचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. बारावीचा पेपर सुरू होताच एक तासातच प्रश्‍नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर कशी फिरली, या प्रकारामागे नेमका हात कोणाचा, प्रश्‍नपत्रिका नेमकी कोणी व्हायरल केली, यात खरे दोषी कोण याचा शोध घेण्याची मागणी पालकवर्गामधून होत आहे. 

पहिलाच पेपर व्हायरल झाल्यामुळे वर्षभर  अभ्यास करून  आज परीक्षेला सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांवर मात्र या व्हायरल प्रकारामुळे अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रश्‍नपत्रिका फुटल्यामुळे बोर्डाकडून कोणता निर्णय घेतला जाणार याकडे पालकांसह गुणवंत विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. परीक्षेच्या प्रारंभीच  घडलेल्या पेपरफुटी प्रकारानंतर उर्वरित पेपरमध्ये पेपरफुटी टाळण्यासाठी बोर्डाकडून कोणती काळजी घेतली जाणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हायरल झालेली प्रश्‍नपत्रिका नेमकी कुठून व्हायरल झाली याबाबत चर्चिले जात आहे.