Thu, Jun 20, 2019 20:41होमपेज › Solapur › शहर हद्दीतील वगळलेल्या  १४ गावांचा समावेश होणार 

शहर हद्दीतील वगळलेल्या  १४ गावांचा समावेश होणार 

Published On: Jan 11 2018 1:09AM | Last Updated: Jan 10 2018 10:54PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुका आता थेट शेतकर्‍यांमधून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सात-बारा उतारा असणार्‍या आणि कार्यक्षेत्रात असणार्‍या शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे; मात्र शहर हद्दीतील काही गावे या मतदार यादीतून वगळण्यात आली होती. त्या गावांविषयी कायद्यात ज्याप्रमाणे तरतूद आहे, त्याप्रमाणे समाविष्ट केली जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीसाठी सध्या प्रारूप याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे यावर येणार्‍या हरकती आणि आक्षेप यांची कायदेशीर पडताळणी करुन जे योग्य आहे त्याविषयी कायद्याच्या चाकोरीत राहून योग्य निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे कोणतीही गावे वगळली नव्हती अथवा वगळण्याचा प्रश्‍न येत नाही. त्यामुळे कोणीच गैरसमज करुन घेऊ नये, असे जिल्हाधिकारी भोसले यावेळी म्हणाले. सध्या तयार होत असलेल्या मतदार याद्या या अंतिम नाहीत, त्या प्रारुप आहेत. त्यामुळे त्या अंतिम होईपर्यंत योग्य बदल केले जातील, असेही ते यावेळी म्हणाले. ज्या शेतकर्‍यांच्या नावे किमान दहा गुंठे जमीन आहे अशा सर्व शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांचा समावेश या मतदार याद्यांमध्ये होणार आहे. त्यामुळे या मतदार याद्या अंतिम होईपर्यंत कोणीही गैरसमज करुन घेऊ नये, असेही प्रशासनाने म्हटले आहे.