Fri, Jul 19, 2019 22:27होमपेज › Solapur › अर्जबाद संचालकांचा आज फैसला

अर्जबाद संचालकांचा आज फैसला

Published On: Jun 07 2018 11:02PM | Last Updated: Jun 07 2018 10:29PMसोलापूर ः प्रतिनिधी 

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जवळपास सात संचालकांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी अवैध ठरविले होते. त्या सर्वांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे अपील दाखल केले असून, त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शुक्रवारी फैसला सुनावणार आहेत. त्यामुळे अपीलकर्त्यांचे अर्ज मंजूर होणार की पुन्हा नामंजूर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी चेअरमन दिलीप माने, इंदुमती अलगोंडा, अशोक देवकते, अविनाश मार्तंडे, सिद्धाराम चाकोते, इसापुरे आणि मिलिंद मुळे यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी थकबाकीचे कारण सांगून अवैध ठरविले होते.

 या विरोधात माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मानेंच्या अर्जावर योग्य निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना देतानाच निर्देशपत्रात प्रक्रियेवर ताशेरे ओढले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार अर्ज बाद झालेल्या संचालकांनी गुरुवारी अपील दाखल केले असून, त्यावर शुक्रवारी निर्णय होणार आहे. या निवडणुकीत व्ही.एन. गायकवाड आणि राजकुमार वाघमारे यांनीदेखील अर्ज भरलेला आहे. हे दोघेही शिक्षक असून, त्यांनी शिक्षणाधिकार्‍यांची परवानगी घेतली नसल्याची बाबही उघडकीस आली आहे. त्यामुळे त्यांचेदेखील अर्ज अवैध ठरविण्यात आले होते. या दोन शिक्षकांनीही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे अपील केले असून त्यांच्या अर्जावरही निर्णय दिला जाणार आहे.