Tue, Jul 16, 2019 22:23होमपेज › Solapur › पहिल्याच पावसात रस्त्याचा बट्ट्याबोळ, 27 लाखांचा चुराडा

पहिल्याच पावसात रस्त्याचा बट्ट्याबोळ, 27 लाखांचा चुराडा

Published On: Jun 11 2018 1:09AM | Last Updated: Jun 10 2018 7:52PMमोहोळ : वार्ताहर 

मोहोळ-कामती-मंद्रुप रस्त्यावर पडलेल्या जागोजागचे दोन-दोन फुटाचे खोल खड्डे भरण्यासाठी 27 लाख रुपये खर्चून अवघे सहा महिनेदेखील झाले नसतील. मात्र आता पहिल्याच पावसात या राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा तसेच खोलवर खड्डे पडल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणे धोक्याचे आणि जीवघेणे बनले आहे.  या महामार्गावर आता कुणाचाच भरवसा उरला नसल्याची वस्तुस्थिती असली तरी पर्यायी मार्ग नसल्याने याच भीतीदायक मार्गाचा अवलंब करण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.

पुणे-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ-कामती-मंद्रुप या बायपास महामार्गावर अक्षरशः खड्ड्यांमुळे कुठेच सरळ रस्ता दिसत नाही. पुणे येथून निघालेले वाहन मोहोळपर्यंत व्यवस्थित येते, मात्र मोहोळवरुन विजापूर बायपास राष्ट्रीय महामार्ग लागताच त्या वाहनचालकांना रस्त्यांतील खड्ड्यांचा तुफान सामना करावा लागत आहे. या महामार्गावरील खड्डे म्हणजे जणू वाहनचालकांसाठी शासन आणि प्रशासनाकडून लावलेला  मृत्यूचा सापळा असून दोन-तीन फुटाच्या खड्ड्यातून कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. 

जनहित संघटना आणि शिवसेनेने रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलने उभारली. यामुळे नोव्हेंबर 2017 मध्ये या रस्त्याच्या डागडुजीसाठी सुमारे 27 लाखांचा निधी मंजूर करून खड्डे बुजविले देखील. मात्र हे थातूरमातूर पद्धतीने अधिकार्‍यांचे हात ओले करुन बुजविलेले खड्डे अवघ्या काही दिवसात उखडायला चालू झाले. खड्डे बुजविताना कमी डांबराचा वापर केल्याने बुजविलेल्या खड्ड्यातून खडी बाहेर पडून पुन्हा त्याच जागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे 27 लाख रुपये खर्चून केलेले काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप वाहनचालकांमधून होत आहे. 

दरम्यान, निष्कृष्ट काम असल्याने खड्ड्यातून निघालेल्या खडी, दगड- गोट्यांमुळे कित्येक दुचाकीस्वार घसरुन पडल्याने जखमी झाले आहेत. या राष्ट्रीय महामार्ग क्र.165 वरुन प्रवास करणे म्हणजे मृत्यूच्या चक्रव्यूहातून प्रवास केल्यासारखे असल्याने या रस्त्याने जाण्यासाठी अनेक वाहनचालक टाळाटाळ करत असतात. मात्र टेंभुर्णी-पंढरपूर हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद केल्याने याचा लोडदेखील याच रस्त्यावर पडला आहे. 

मोहोळहून निघाल्यानंतर कारंडे वस्ती, नजीक पिंपरी येथील राजस्थानी ढाबा कामती पोलिस स्टेशनच्या समोर, कामतीच्या दोन्ही चौकात, कोरवली येथील दोन्ही वळणावर, कंदलगाव चौक, येळेगाव, मंद्रुपपर्यंत रस्त्यावर शेकडो मोठमोठे खड्डे पडले आहेत. यापूर्वी अनेकदा या खड्ड्यांसाठी मोठमोठी जनआंदोलने उभारली होती. तेव्हा खड्ड्यांचा प्रश्‍न मार्गी लागला. त्यामुळे प्रत्येक वेळी जनआंदोलन उभारायचे का, असा संतप्त सवाल वाटसरु आणि स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.