होमपेज › Solapur › वापराअभावी ‘गुलमोहर’ कोमेजला

वापराअभावी ‘गुलमोहर’ कोमेजला

Published On: Mar 16 2018 11:07PM | Last Updated: Mar 16 2018 10:46PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी आपला मुक्काम नवीन निवासस्थानी हलवल्यानंतर जुन्या निवासस्थानाची वापराअभावी दुरवस्था झाली आहे. जुगार आणि तळीरामांचा अड्डा बनल्यामुळे ‘गुलमोहर’ कोमेजला असल्याचे दिसून येत आहे.

मुख्याधिकार्‍यांचे  निवासस्थान   म्हणून जुन्या नगरपालिका रुणालयाजवळील ‘गुलमोहर’ ही इमारत वापरात होती. नुकतेच मुख्याधिकार्‍यांसह नगरपालिकेच्या अधिकार्‍यांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या सदनिकांमध्ये मुख्याधिकार्‍यांनी मुक्‍काम हलवला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून जुने मुख्याधिकारी निवास ‘गुलमोहर’ हे वापराअभावी पडून आहे. ‘गुलमोहर’मधील काही खोल्यांचा वापर स्टोअर म्हणून केला जात आहे. येथे असलेला नगरपालिकेचा दवाखानाही आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. येथील कुटुंब नियोजन विभाग बंद अवस्थेत आहे. पालिकेच्या कर्मचार्‍यांच्या क्वॉर्टर्स काही प्रमाणात  वापरात आहेत. तरीही रात्रीच्या वेळी या परिसरात अवैध बाबी  चालत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अग्निशामक केंद्रही लवकरच  नवीन केंद्राकडे स्थलांतरित केले जाणार आहे. त्यामुळे मुख्याधिकार्‍यांच्या जुन्या निवास्थानासह नगरपालिका रुग्णालय, अग्मिशामक केंद्र वापराअभावी पडून राहणार आहे. नगरपालिकेने या जुन्या इमारती दुरुस्त करून पुनर्वापरात आणाव्यात, अशी मागणी होत आहे.  

‘गुलमोहर’ इमारतीचा सध्या स्टोअर म्हणून वापर केला जात आहे. कुटुंब नियोजन इमारत पूर्णपणे बंद आहे. अग्निशामक केंद्र नवीन ठिकाणी हलवले असले तरी जुन्या केंद्राचा पर्याय म्हणून वापर सुरूच ठेवण्याचा विचार आहे. न.पा. रुग्णालयाच्या मागील बाजूस कर्मचार्‍यांच्या क्वॉर्टर्स आहेत. नवीन कर्मचारी आले तर त्यांना याच क्वॉर्टर्स दिल्या जाणार आहेत. या परिसराच्या सुरक्षेकरिता सुरक्षारक्षक नेमण्याचा विचार चालू आहे. 

- अभिजित बापट मुख्याधिकारी, नगरपालिका, पंढरपूर