Tue, Jul 23, 2019 04:04होमपेज › Solapur › पंढरपुरात भरदिवसा युवकावर खुनी हल्ला 

पंढरपुरात भरदिवसा युवकावर खुनी हल्ला 

Published On: Jun 11 2018 1:09AM | Last Updated: Jun 10 2018 10:31PMपंढरपूर : प्रतिनिधी

नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनाचे पडसाद अजूनही उमटत असतानाच रविवारी (दि. 10) भर दिवसा आणखी एका युवकावर चाकूने भोकसून खुनी हल्ला करण्यात आला आहे. गर्दीने गजबजलेल्या पंढरपूर-कराड मार्गावर रेल्वे मैदानासमोर  पिनू (स्वप्निल) संताजी ठाकरे (वय 26) या युवकास भोकसण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे. पूर्ववैमनस्यातूनच हा खुनी हल्ला झाला असल्याची चर्चा आहे.

पंढरपूर-कराड रोडवरील रेल्वे मैदानावर रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पिनू (स्वप्निल) ठाकरे (रा. हॉटेल नागालँडशेजारी, लिंक रोड, पंढरपूर) यास  पूर्ववैमनस्यातून चाकूने  मानेवर, खांद्यांवर, पाठीवर तीन  जणांनी सत्तूरने सपासप वार केलेे. या झटापटीत स्वप्निल ठाकरे याच्या हातात रेल्वे मैदानाच्या भिंतीवरील लोखंडी पाईप लागल्याने त्याने त्याही अवस्थेत हल्लेखोरांचा प्रतिकार केल्याने हल्लेखोर त्या ठिकाणाहून पळून गेले. जखमी अवस्थेतील स्वप्निल ठाकरे यास येथील लाईफ लाईन हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. या ठिकाणी  औषधोपचारास प्रतिसाद दिल्यानंतर त्याला पुढील उपचाराकरिता सोलापूर येथे हलवण्यात आले आहे. हल्ला झाला त्या ठिकाणी रस्त्यावर रक्‍ताचा सडा पडला आहे. घटनास्थळी पोलिसांना सत्तूर सापडला आहे. शहर पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास पीएसआय बुवा करत आहेत.