Sun, May 26, 2019 08:41होमपेज › Solapur › बाजार समितीच्या ‘रिहर्सल’वर आमदारकीची मदार

बाजार समितीच्या ‘रिहर्सल’वर आमदारकीची मदार

Published On: Jul 03 2018 1:55AM | Last Updated: Jul 03 2018 1:04AMसोलापूर : प्रशांत माने

सोलापूर व बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकनिमित्ताने गेल्या महिन्याभरात सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर तालुका आणि बार्शी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांवरून सोलापूर बाजार समितीची निवडणूक यंदा चांगलीच रंगली. या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुकी आडून जणू आगामी विधानसभा निवडणुकीची ‘रिहर्सल’च असल्याचे चित्र निर्माण झाले होते. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सहकारमंत्री सुभाष देशमुख व माजी आमदार दिलीप माने आणि बार्शी विधानसभा मतदारसंघात आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आगामी विधानसभेचा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. बाजार समितीची ‘रिहर्सल’ कोण जिंकणार, यावरुन विधानसभेची गणिते मांडणे सोपे जाणार आहे.

पुढील वर्षी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या रंगलेल्या प्रचारास आणि निकालास महत्त्व आहे. कारण बाजार समितीच्या निवडणुकीकडे जर का विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिले तर आगामी निवडणुंकांचे चित्र कसे असणार, याचे आडाखे बांधणे सोपे जाणार आहे. यंदाच्या बाजार समिती निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे यावेळी पहिल्यांदाच बाजार समिती क्षेत्रातील सर्वच शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होता. आजपर्यंत ठराविक मतदारांच्या मतदानावरच या निवडणुकीचे निर्णय होत होते. परंतु सर्वच शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार मिळाल्याने बाजार समितीच्या निवडणुकीचे स्वरुप मोठे झालेले आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सहकारमंत्र्यांनी भाजपचे पॅनेल उतरवल्याने बाजार समितीवर पारंपरिक सत्ता गाजवणार्‍या काँग्रेसला यंदा पहिल्यांदाच तगडे आवाहन या निवडणुकीत होते. दस्तुरखुद्द सहकारमंत्री निवडणुकीची धुरा सांभाळत होते, तर काँग्रेसचे बडे नेतेही या निवडणुकीत लक्ष घालून होते. सर्व शेतकर्‍यांना पहिल्यांदाच मिळालेला मतदानाचा अधिकार व बाजार समितीमधील ऑडिट आणि पोलिसांत दाखल झालेले गुन्हे हा मुद्दा सहकारमंत्र्यांनी या निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा केला. तर सहकारमंत्री सुडाचे राजकारण करत असल्याचे सांगत बाजार समितीतील ऑडिटचा पोलखोल करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात कोर्टकचेरीमध्ये अडकलेल्या काँग्रेसवाल्यांना प्रचारात लक्ष देता आले नाही. काँग्रेसची यंदाची जमेची बाजू म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री होय. कारण भाजपचे स्वतंत्र पॅनेल असतानाही पालकमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच्या पॅनेलमधून उमेदवारी दाखल केली होती. त्याचा परिणाम झाला असा की, दोन्ही मंत्र्यांमध्ये वाद असून ते जिल्ह्याचा विकास करु शकत नाहीत ते बाजार समितीच्या माध्ममातून शेतकर्‍यांचा विकास काय करणार, असाच संदेश लोकांपर्यंत पोहोचला.

बाजार समिती निवडणुकीच्या आडून सहकारमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीची चाचपणी घेतली, तर माजी आमदार दिलीप माने यांनीही यंदा सहकारमंत्र्यांना टक्कर देऊन दक्षिणची जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी नेमकी रणनीती काय आखायची याचा गृहपाठ निश्‍चितच केला असणार आहे. 

बाजार समिती निवडणुकीत सहकारमंत्र्यांविरोधात शड्डू ठोकणारे पालकमंत्री आगामी विधानसभा निवडणुकीत दक्षिणमध्ये कोणती भूमिका घेणार, हेदेखील दिलीप माने यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. दोन्ही देशमुखांमधील वाद काँग्रेसच्या पर्यायाने मानेंच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

बार्शी विधानसभा मतदारसंघात आमदार सोपल व माजी आमदार राऊत यांच्यात होणारी पारंपरिक लढत अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. बार्शी बाजार समिती निवडणुकीच्या रंगीत तालमीनंतर या दोन्ही प्रतिस्पर्धी दिग्गजांना भूमिका घेण्यात मदतच होणार आहे. 

बार्शी मतदारसंघात पक्षापेक्षा व्यक्तीकेंद्रीतच निवडणुका होत असल्याचा इतिहास आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे दिलीप सोपल यांनी अपक्ष म्हणूनदेखील बार्शीत निवडणूक लढवून विजय मिळवलेला आहे. तर यावेळी  भाजपच्या तंबूत असलेले राजेंद्र राऊत यांनी यापूर्वी शिवसेनेच्या तिकिटावर आमदारकी खेचून आणलेली आहे. 

बार्शीतील निवडणूक नेहमीच चुरशीची आणि अटीतटीची अशीच असते. कारण पक्ष कोणता का असेना हे दोन्ही दिग्गज उमेदवार मैदानात असतील तर निवडणुकीत चुरस आणि रंगत असणार, हे निश्‍चित मानले जाते.