Tue, Mar 19, 2019 05:12होमपेज › Solapur › आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव दांपत्याला 

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव दांपत्याला 

Published On: Jul 22 2018 11:46PM | Last Updated: Jul 22 2018 11:46PMसोलापूर : प्रतिनिधी 

आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान यंदा अनिल गंगाधर जाधव (वय ३७)  आणि  वर्षा अनिल जाधव ( वय ३५)  या दांपत्याला मिळाला आहे. हिंगोली तालुक्यातील भगवंती कडोळी ( ता. शेणगाव) येथील हे वारकरी आहेत. 

गेल्या चार वर्षापासून हे दांपत्य माउलींच्या पायी वारी करतात. दहावी पर्यंतचे शिक्षण झालेल्या या दांपत्याला मुलगा आणि दोन मुली असून विठ्ठलाची वारी ते दरवर्षी मुलाला वा मुलीला घेउन करतात.

यंदाचे मानाचे वारकरी दरवर्षी पेक्षा अधिक भाग्यवान आहेत. कारण दरवर्षी मानाच्या वारकऱ्यांना शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळत असला तरी प्रत्यक्ष पूजेचे सर्व विधी मुख्यमंत्री व त्यांच्या सौभाग्यवतींच्या हस्ते होत असते. मात्र यंदा मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना पूजेपासून अडवून धरल्याने मुख्यमंत्री पूजेला आले नाहीत. मात्र ही पूजा एका सामान्य वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात येइल अशी घोषणा मुख्यमंत्र्यानी केली. त्यामुळे यंदा या मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते पूजेचे सर्व विधी होणार आहेत.

असे शोधले जातात मानाचे वारकरी

शासकीय पूजा सुरु होण्याच्या सुमारे दोन तास आधीच दर्शन मंडपाचे मुख्य प्रवेश व्दार बंद केले जाते. मंडपातून मंदिरात येणाऱ्या भाविकांमध्ये जे माळकरी भाविक आहेत. ज्यांच्या घरात वारीची परंपरा आहे. जे सहकुटुंब पायी वारी करतात असे भाविक पुकारले जातात. मंदिराच्या अतिशय जवळ आलेल्या अशा भाविक दांपत्याला महापूजेत सहभागी होण्याचा मान दिला जातो.