Thu, Jun 27, 2019 17:53होमपेज › Solapur › बंधू भेटीने वैष्णवजन भारावले

बंधू भेटीने वैष्णवजन भारावले

Published On: Jul 21 2018 11:19AM | Last Updated: Jul 21 2018 11:20AMभाळवणी : नितीन शिंदे

माय-बाप तूच तुझाच आसरा, तुझ्यावरी जीव जडला आहे।
नाही मज माया संसारमोहाची, तुझ्याचसाठी मन ओढ खाई॥

विठ्ठल भेटीची आस लागलेल्या लाखो वैष्णवांचा आनंदमेळा चैतन्यमयी वातावरणात पंढरपूर तालुक्यात आज, शुक्रवारी दाखल झाला. पंढरपूर तालुक्यात प्रवेश करीत असताना टप्पा (ता. पंढरपूर) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर व सोपानकाका यांच्या बांधवांच्या भेटीचा सोहळा पाहून वैष्णवजन भारावून गेले. या बंधू भेटी सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेल्या लाखो वैष्णवांचे डोळे पाणावले. त्यानंतर संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत सोपानकाकांचा पालखी सोहळा संध्याकाळी भंडिशेगाव मुक्‍कामी पोहोचला.

दरम्यान, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बोरगाव (ता. माळशिरस) येथील मुक्‍काम आटोपून पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथे मुक्‍कामासाठी दाखल झाला आहे. पालखी मार्गावरून लाखो वारकर्‍यांसह संत गुलाबबाबा महाराज, संत गोविंद महाराज उपळेकर, संत निळोबाराम महाराज,संत गवरशेठ लिंगामत वाणी महाराज, चांगावटेश्‍वर पालखी सोहळ्यांनी पंढरपूर तालुक्मात प्रवेश केला.  आबालवृध्द वारकरी, खांद्यावर भगवी पताका, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोेष, लाडक्या विठ्ठलाला अंभागातून दिलेली हाक, लयीत वाजणारे  टाळ आणि विठुनामाचा गजर करित पालखी सोहळ्यातील एक एक दिंडी पुढे सरकत होती. एक एक दिंडी पुढे सरकत असताना बंधुभेटीचा सोहळा पाहण्यासाठी वैष्णव व परिसरातील ग्रामस्थांनी कडेला असलेल्या झाडाझुडपांच्या आश्रयाला गर्दी केली होती.

 दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची पालखी पंढरपूर तालुक्यात दाखल झाली.  तत्पूर्वी बोंडले येथून संत सोपानकाकांचा पालखी सोहळा टप्पा येथे दाखल झाला होता आणि बंधूवर्य ज्ञानेश्‍वरांच्या आगमनाची प्रतिक्षा करीत होता. टाळमृदुगांचा गजर आणि विठ्ठल-विठ्ठल, ज्ञानोबा-तुकारामच्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.  जसजसा दोन्ही पालखी सोहळा समीप येऊ लागला तसतसा संपूर्ण परिसर विठ्ठल नामाचा गजर अन् वैष्णवांच्या टाळ्याच्या कडकडाटाने भक्तीमय झाला. काहीजण देहभान, वय विसरून नाचणारे विठ्ठल नामाच्या गजरात दंग झाले होते. अखेर सायंकाळी गोरस मुहूर्तावर 6.30 वाजता माऊली व सोपानकाका बंधुभेटीचा सोहळा वैष्णवांच्या भक्‍तीरसात न्हाऊन निघाला अन् उपस्थित असलेल्या लांखो वैष्णवांचे डोळे पाणावले. या बंधुभेटीनंतर प्रथम सोपानकाका व नंतर ज्ञानेश्‍वर पालखी सोहळा भंडिशेगांव येथील मुक्कामी ठिकाणी मार्गस्थ झाला.

तत्पूर्वी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दुपारी 3 वाजता पंढरपूर तालुका नगरीत दाखल झाला. तुकाराम-तुकाराम नामाच्या जयघोषात व तोफांची सलामी देवून या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. या स्वागतानंतर जगद‍्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा पिराची कुरोली येथील पालखी तळ मुक्कामी मार्गस्थ झाला. 

वैष्णवांच्या स्वागतासाठी आ. बबनदादा शिंदे, आ. भारत भालके, सभापती राजेंद्र पाटील, उपसभापती अरूण घोलप, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्माणराव काळे, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सदस्य सदस्य संभाजी शिंदे, भगवान चौगुले, शिवाजी गवळी, तानाजी वाघमोडे, प्रातांधिकारी सचिन ढोले, तहसिलदार मधुसुदन बर्गे आदीसह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.