Sat, Aug 24, 2019 22:06होमपेज › Solapur › माऊलीच्या जयघोषात वाखरीत रंगले रिंगण

माऊलीच्या जयघोषात वाखरीत रंगले रिंगण

Published On: Jul 21 2018 10:35PM | Last Updated: Jul 21 2018 9:40PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरीचा महिमा । देतां अणिक उपमा ॥
ऐसा ठाव नाही कोठे । देव उभा उभी भेटे ॥

पंढरीच्या वारीतील अखेरचे भव्य गोल रिंगण बाजीराव विहीर येथे आज पार पडले. ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे  रिंगण संपन्‍न झाले. दोन्ही अश्‍वांनी वायूवेगाची नेत्रदीपक दौड करून लाखो वैष्णवांच्या  डोळ्याचे पारणे फेडले. पंढरपूर तालुक्यातील बाजीराव विहिरीजवळ संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचे तालुक्यातील पहिले व माऊलीचे शेवटचे गोल रिंगण मोठ्या भक्‍तिभावाने संपन्‍न झाले. यावेळी वैष्णवांच्या उत्साहाला उधाण आले होते. 

या रिंगण सोहळा परिसरात सळसळणारे चैतन्य, ज्ञानोबा-तुकाराम-विठ्ठलाच्या जयघोषाने दुमदुमलेला आसमंत, अश्‍वाबरोबर धावणारे वैष्णवजन, डौलाने फडकणार्‍या पताका, टाळ-मृदंगाचा गजर... 
अशा भक्तीमय वातावरणात पंढरीनगरीजवळ असलेल्या बाजीराव विहिरीजवळ गोल रिंगण सोहळा लांखो भाविकांनी पाहिला. टाळ-मृदुगांच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. प्रारंभी रात्रीच्या भंडिशेगांवचा मुक्कामनंतर सकाळी न्याहारी आटोपून ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा वाखरी मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. टाळकरी, विणेकरी व त्यानंतर हंडे व तुळशीधारक महिला वारकरी क्रमाने एका मागून एक पंढरीच्या दिशेने रस्त्याला लागल्या. विठूरायाच्या दर्शनाची आस त्यांना लागली होती. 

पंढरीच्या दिशेने पायी चालत असताना बाजीराव विहिरीजवळ गोल रिंगण सोहळ्याच्या भव्य प्रांगणात ज्ञानेश्‍वर पालखी सोहळा विसावला. त्यानंतर पालखी रथातून काढून प्रथम संपूर्ण गोल रिंगणाला फेरी मारून मधोमध आणून ठेवली. यावेळी टाळ-मृदुंगांच्या गजरात अत्यंत भक्‍तीमय वातावरणात गोल रिंगणाभोवती वार्‍याच्या वेगाने देहभान विसरून धावा केला. रिंगण पाहण्यासाठी आतूर झालेल्या भाविकांचे लक्ष माऊलीच्या अश्‍वाकडे लागले होते. स्वराचा अश्‍व रिंगणात दाखल झाल्यानंतर ज्ञानोबा-तुकाराम व टाळ-मृदुंगाच्या गजराने सारा परिसर वैष्णवांच्या भक्‍तिरसात चिंब झाला. त्यानंतर 5 वाजता गोल रिंगण सोहळा सुरू झाला असता चोपदारांनी प्रथम अश्‍वाला रिंगण दाखविले. त्यानंतर स्वाराचा अश्‍व पुढे त्यापाठोपाठ माऊलीचा अश्‍व अन् डोळ्याची पापणी लवते तो  या दोन्ही अश्‍वांनी दोन फेर्‍या पूर्ण केल्या. हा रिंगण सोहळा सुरू असताना काही माऊलींनी जागेवरती मनोरे तयार करून टाळमृदुगंच्या जयघोषात माऊली माऊलीचा जयघोष केला. दोन फेर्‍या पूर्ण झाल्यानंतर अश्‍वाच्या पाया खालची माती कपाळी लावण्याची वैष्णवांची एकच झुबंड उडाली. हा अविस्मरणीय रिंगण सोहळ्याचा क्षण आपल्या डोळ्यात साठवून विठ्ठलाच्या भक्‍तिरसात चिंब होऊन वाखरी मुक्कामी मार्गस्थ झाला.