Tue, May 21, 2019 04:42होमपेज › Solapur › महापूजेवेळी मुख्यमंत्र्यांना घेराओ

महापूजेवेळी मुख्यमंत्र्यांना घेराओ

Published On: Jul 21 2018 1:34AM | Last Updated: Jul 20 2018 11:02PMसोलापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासह इतर प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य कराव्यात अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीला श्री विठ्ठलाची महापूजा होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांना घेराओ घालणार, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक स्व. अण्णासाहेब पाटील यांनी 1982 साली मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वप्रथम विधानसभेत मांडला. त्याला 46 वर्षे पूर्ण झाली. याकाळात प्रत्येक सत्तारूढ सरकारने मराठा समाजाला आश्‍वासने दिली. परंतु यापुढे सरकारने मराठा समाजबांधवांची दिशाभूल करू नये. आरक्षणाला बगल देऊ नये. आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे करण्यात आली आहे. 

गेल्यावर्षी 58 मोर्चे काढले. तरीही सरकारला जाग आली नाही. त्यामुळे या सरकारचा निषेध म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे 15 ते 20 हजार कार्यकर्ते आषाढी वारीत घुसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूजेसाठी आल्यास त्यांना घेराओ घालणार आहेत. त्यांना विठ्ठलाची पूजा करण्यापासून रोखणार आहेत. त्यामुळे सरकारने तत्काळ मराठा आरक्षणाबाबतची ठोस भूमिका स्पष्ट करावी. कोपर्डीतील नराधमांना फाशीची शिक्षा देऊन पीडितेस न्याय द्यावा. आत्महत्या केलेल्या शेतकरीबांधवांच्या कुटुंबातील व्यक्‍तीस सरकारी नोकरी द्यावी, अशा विविध मागण्या महासंघाच्या असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष रायचूरकर, शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे, तालुकाध्यक्ष जाधव, अभिषेक कटके, गायकवाड आदी उपस्थित होते.