Wed, May 22, 2019 16:51होमपेज › Solapur › दोघा मंत्र्यांच्या भांडणात विरोधकांचा लाभ

दोघा मंत्र्यांच्या भांडणात विरोधकांचा लाभ

Published On: Jul 16 2018 1:20AM | Last Updated: Jul 15 2018 10:41PMसोलापूर : प्रशांत माने

सोलापूरचे सुपूत्र असलेले राज्याचे दोन मंत्री यांच्यातील वाद आता महाराष्ट्रभर गाजत आहे. दोघा मंत्र्यांमधील भांडणाचा लाभ विरोधक उत्तमपैकी उठवत असल्याचे नुकतेच दिसून आले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोघा मंत्र्यांच्या वादाचा लाभ उठवत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांनी सहकारमंत्र्यांचे बाजार समितीच्या सत्तेचे स्वप्न मोडले. तर महापालिका गाळ्यांच्या प्रश्‍नात सोलापूर व महापालिकेच्या हितासोबत असलेल्या पालकमंत्र्यांना सर्व विरोधकांनी सहकारमंत्री व महापौरांच्या साथीने धोबीपछाड दिल्याने दोघांच्या भांडणात लोण्याचा गोळा विरोधक आवडीने खात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ’ ही गोष्ट लहानपणी शाळेत शिकवली जात होती, पण बहुधा मोठेपणी ती विसरली जात असावी अथवा स्वार्थ व इगो पायी अशा गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असावे, असा प्रत्यय सोलापूरकरांना येत आहे. वैतागलेल्या जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेवरून हटवले. सोलापूरचे दोन आमदार मंत्री झाल्याने आता सोलापूरचा विकास अटळ असल्याचे स्वप्न पाहणार्‍या सोलापूरकरांचे हे स्वप्न दिवास्वप्नच ठरत असल्याचे दिसत आहे.

काँग्रेसमधील दुफळीचा आधार घेत सहकारमंत्र्यांनी बाजार समितीतील सत्ताधारी काँग्रेसमध्ये बरोबर फूट पाडली. काँग्रेसवाल्यांना बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हा दाखल करुन कायद्याच्या चक्रव्यूहात अडकवून राजकीय चाल चालली. बाजार समिती कार्यक्षेत्रातील सर्वच शेतकर्‍यांना मतांचा अधिकार देत काँग्रेसच्या पारंपरिक व्होटबँकेला छेद दिला. 

काही वर्षांपासून बाजार समितीची सत्ता हाती घेण्यासाठी सहकारमंत्र्यांनी बाजार समितीचे ताक घुसळून-घुसळून लोणी काढले खरे, पण काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांनी पालकमंत्र्यांना हाताशी धरत सहकारमंत्र्यांनी काढलेला लोण्याचा गोळा खाऊन टाकला. सहकारमंत्र्यांच्या मेहनतीवर पालकमंत्र्यांनीच पाणी फेरल्याचे गुर्‍हाळ नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात देखील चेष्टेने चर्चिले गेले.
पालकमंत्र्यांना हाताशी धरत विरोधकांनी बाजार समिती निवडणुकीत सहकारमंत्र्यांना धूळ चारल्याचा घाव जिव्हारी लागल्याने सहकारमंत्र्यांनी महापालिका गाळ्यांच्या प्रश्‍नात पालकमंत्र्यांवर पलटवार केला. शासनाच्या आदेशानुसारच पालिकेच्या गाळ्यांचे ई-टेंडरिंग व भाडेवाढ अटळ होती. सोलापूर शहर व महापालिकेचे हित जोपासण्यासाठी पालकमंत्र्यांनी व्यापार्‍यांची बाजू न घेता शासनाच्या आदेशाचे पालन करण्याची महत्त्वाची भूमिका घेतली. 

पालकमंत्री गाळेधारकांच्या बाजूने नसल्याचे दिसताच  विरोधी पक्ष शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी-बसपा-एमआयएम-माकप यांनी गाळेधारकांची बाजू उचलून धरली. सहकारमंत्री गटाच्या असलेल्या महापौरांनी देखील विरोधकांच्या सूरात सूर मिसळला. पालकमंत्र्यांना बाजूला सारून महापौर व विरोधकांनी व्यापार्‍यांना सोबत घेऊन सहकारमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर गाठून मुख्यमंत्र्यांकडून दिलासा मिळवला. बाजार समिती व महापालिका गाळे ही दोन्ही प्रकरणे पाहिल्यानंतर दोघा मंत्र्यांच्या भांडणाचा लाभ विरोधकांनी कसा उचलला हे लक्षात येते.  आपल्यातील  वादामुळे   आपल्या पक्षासह सोलापूरचे नुकसान होत असून विरोधकांचा लाभ होत असल्याचे माहिती असूनही आपसातील वादाचा प्रश्‍न प्रतिष्ठेचा करुन दोन्ही मंत्री लोण्याचा गोळा विरोधकांच्या घशात घालत आहेत. परंतु मंत्र्यांच्या या वागणुकीचा परिणाम सोलापूरच्या विकासावर  होत असल्याने सोलापूरकर नाराज आहेत. सोलापूरकर हे सर्व मनात खूणगाठ बांधून  ठेवत असून आगामी निवडणुकीत याचे परिणाम मतपेटीवर दिसणार, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही, हे मात्र निश्‍चित.

नागपूर अधिवेशनातही दोघा मंत्र्यांच्या भांडणाच्या चर्चेची चेष्टा !
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख आणि राज्याचे आरोग्य, कामगार, परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख एकमेकांविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले. विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या पॅनलमधून निवडणूक लढवून विजय मिळवला. तर या निवडणुकीत राज्याच्या सहकार व पणन मंत्र्यांचा पराभव झाल्याची चर्चा वार्‍यासारखी अवघ्या महाराष्ट्रभर पसरली. विशेष म्हणून सध्या सुरु असलेल्या राज्याच्या नागपूर हिवाळी अधिवेशनातदेखील दोघा मंत्र्यांच्या भांडणाची चर्चा रंगली आहे. कोणीही देशमुख समोर आला की विरोधी पक्षाचे नेते त्यांना चेष्टेने या विषयावर बोलते करताना दिसतात, तर दोन्ही मंत्री देखील त्यांना हसतच उत्तर देत वेळ मारतात.