Wed, Mar 27, 2019 02:36होमपेज › Solapur › स्थायी समिती सदस्यांच्या मनपा सभेतील नियुक्त्या बेकायदेशीर 

स्थायी समिती सदस्यांच्या मनपा सभेतील नियुक्त्या बेकायदेशीर 

Published On: Feb 21 2018 1:19AM | Last Updated: Feb 21 2018 1:19AMसोलापूर :  प्रतिनिधी

प्रभारी सभागृहनेत्याची नियुक्‍ती अधिकृतपणे झाली नसताना  महापौर शोभा बनशेट्टी महापालिका सभेचे कामकाज बेकायदेशीरपणे चालवित आहेत. त्यामुळे शनिवारी मनपा सभेत स्थायी समिती सदस्यांच्या केलेल्या नियुक्त्यादेखील बेकायदेशीर असून त्या रद्द करण्याची मागणी स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांनी आयुक्तांकडे केली आहे.

मनपातील सत्ताधारी पालकमंत्री व सहकारमंत्री या दोन गटांतील वादाने कहर केला आहे. गत दोन महिन्यांपासून सभागृहनेते सुरेश पाटील आजारी असल्याने  प्रभारी सभागृहनेतेपदावरुन या दोन गटांत नवा वाद निर्माण झाला आहे. या पदाच्या नियुक्‍तीबाबत दोन्ही गटांत समेट होत नसल्याने ही नियुक्‍ती रखडली आहे. हा वाद प्रदेश भाजपकडे जाऊनही त्यावर तोडगा काढण्यात आला नाही. 

दरम्यान, पाटील आजारी पडल्यापासून आतापर्यंत दोन-तीन सभा झाल्या. या सभेत सूचना वाचण्याची म्हणजे प्रभारी सभागृहनेतेपदाची जबाबदारी महापौरांनी नगसेवक नागेश वल्याळ यांच्यावर सोपविली आहे. दरम्यान, गत आठवड्यात झालेल्या तहकूब सभेत चक्‍क वल्याळ व श्रीनिवास रिकमल्ले हे दोनजण एकाचवेळी सूचना वाचण्यास उठल्याने सभागृहनेता नक्‍की कोण, असा सवाल निर्माण झाला होता. महापौरांनी या सभेत वल्याळ यांना सूचना वाचण्यास सांगितले होते.

तद्नंतर शनिवारी फेब्रुवारी महिन्याच्या सभेत वल्याळ यांनीच प्रभारी सभागृहनेता म्हणून काम पाहिले. या सभेत स्थायी समिती सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली. सत्ताधारी दोन गटांत त्यांच्या पक्षाच्या सदस्य नियुक्तीवरुन वाद झाला होता. यानंतर मंगळवारी स्थायी समिती सदस्यांच्या मनपा सभेतील नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत यासंदर्भात आयुक्तांना पत्र दिले. 

सभागृहनेते सुरेश पाटील यांनी आपल्या आजारपणाच्या काळात ही जबाबदारी कोणी पाहावी याचा निर्णय घेतला नाही शिवाय प्रदेश भाजपनेदेखील प्रभारी सभागृहनेत्याची नियुक्‍ती केली नाही. असे असताना महापौरांनी मनपा सभेत परस्पर मनमानी पद्धतीने सभागृहनेता नियुक्त करुन कामकाज रेटले. वास्ताविक महापौरांना सभागृहनेते नियुक्‍तीचा अधिकार नाही. त्यामुळे मनपा सभेचे कामकाज बेकायदेशीर आहे. या अनुषंगाने शनिवारी झालेल्या स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्त्याही अवैध आहेत. या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशा आशयाचे निवेदन कोळी यांनी आयुक्तांना दिले आहे.

दरम्यान, आयुक्‍त परगावी असून बुधवारी सोलापुरात आल्यावर या तक्रारीसंदर्भातील तरतुदी पाहून निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.