Sat, Apr 20, 2019 08:09होमपेज › Solapur › अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी धरणे

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी धरणे

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 10:16PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर सिटूप्रणित संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.  सिटू संलग्न लाल बावटा, आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्यावतीने कॉ. पटेल यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मोर्चा दत्तनगर लाल बावटा कार्यालयापासून ते दत्त चौक, पद्मशाली चौक, किडवाई चौक, बेगम पेठ पोलिस चौकीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा धडकला. 

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासनाने दिलेले आश्‍वासन न पाळल्याने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनकाळात मुंबईत सिटूच्यावतीने अंगणवाडी सेविकांचे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा एम.एच. शेख  यांनी दिला.

यावेळी सिटूचे राज्य महासचिव एम.एच. शेख म्हणाले, राज्य सरकार सत्तेत येताच किमान वेतन जाहीर करून त्याच्या अंमलबजावणीचे सक्‍तीचे आदेश दिले. परंतु, तसे होताना दिसत नाही. वेगवेगळ्या अभियानांतर्गत योजना कर्मचार्‍यांना केवळ गुलामासारखे राबवून घेत आहेत. त्यांना वर्षानुवर्षे कोणतीच सामाजिक सुरक्षा नाही. त्यांना कामगार म्हणून दर्जा देऊन सरकार किमान वेतन लागू करावे अन्यथा आगामी काळातील पावले तीव्र होतील. यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा दिला. 

प्रास्ताविक करताना सलीम पटेल म्हणाले की, 3 ऑगस्ट 2017 रोजी आरोग्यमंत्री  यांना भेटून चर्चा केली असता ते म्हणाले की, आशांना किमान वेतन व दिवाळी भेट देणार. तद्नंतर पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांनीही आशांना किमान वेतन व दिवाळी भेट देण्यासंदर्भात अधिवेशनात मांडणी करणार असल्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर परत 16 जानेवारी 2018 रोजी पुन्हा एकदा त्यांना भेटून आशांच्या मागण्याचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. तरीही याची दखल घेण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी संघटनेच्या जिल्हा व राज्य सचिव पुष्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात ज्योती उराडे, ज्योती कारले, सोनिया सोपल, ऊर्मिला शिंदे, कोमल वाघमारे, सोनाली साठे, सुवर्णा ढेरे, अपेक्षा कुलकर्णी, मंगल वावरगिरे, राजश्री नागरगोजे, कल्पना कांबळे, सुलभा ताबोळकर आदी उपस्थित होते. 

याप्रसंगी सिद्धराम उमराणी, चंद्रशेखर बडदाले, पार्वती स्वामी, लिंगव्वा सोलापुरे, दत्ता चव्हाण आदींनी मनोगत व्यक्‍त केले. सभेचे सूत्रसंचालन कॉ. अनिल वासम यांनी केले.  मोर्चा यशस्वी करण्यासाठी सोमनाथ मरेड्डी, बालाजी गुंडे, धनेश जत्ती, लक्ष्मण जोरीगल, मल्लिकार्जुन बेलियार, दीपक म्हंता, मल्लेशम कारमपुरी, मीरा कांबळे तसेच सिटूचे पदाधिकारी  व सदस्यांनी परिश्रम घेतले.