Thu, Jun 27, 2019 01:48होमपेज › Solapur › ठिय्या आंदोलनास मुस्लिम, धनगर समाजाचा पाठिंबा

ठिय्या आंदोलनास मुस्लिम, धनगर समाजाचा पाठिंबा

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 11:20PMपंढरपूर : प्रतिनीधी  

येथे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास पहिल्याच दिवशी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पहिल्या दिवशी या ठिय्या आंदोलनास मुस्लिम तसेच धनगर समाजाने प्रत्यक्ष आंदोलन स्थळी सहभाग दर्शवून पाठिंबा व्यक्त केला. त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांनीही आंदोलनास पाठिंब्याची पत्रे संयोजकांकडे सुपूर्द केली आहेत. 

येथील तहसील कार्यालयासमोर पंढरपूर शहर आणि तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने 2 ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये पहिल्या दिवशी भाळवणी जि.प.गटातील गावांनी सहभाग नोंदवला होता. दरम्यान सकाळपासूनच या आंदोलनामध्ये विविध सामाजिक, राजकीय पक्ष आणि संघटनांच्यावतीने सहभाग नोंदवण्यात आला आहे. मुस्लिम तसेच धनगर समाजाच्या शिष्टमंडळाच्यावतीने आंदोलनामध्ये सहभाग घेऊन या आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनीही आंदोलनास पाठिंबा दिला आहे. पहिल्या दिवशी माजी आ. आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील, राष्ट्रवादीचे प्रांतीक सदस्य राजूबापू पाटील, बाजार समितीचे माजी सभापती भगवान चौगुले यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. तर जिल्हा परिषद सदस्य तानाजी वाघमोडे, पंचायत समिती सदस्य तथा मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीही आंदोलनात सहभाग दर्शवून पाठिंबा जाहीर केला आहे. या सर्व संघटना आणि पक्षांचे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने प्रवक्ते मोहन अनपट यांनी आभार व्यक्त केले. 

भजन आणि भारूडाने संस्मरणीय ठरला आंदोलनाचा पहिला दिवस
पंढरपूरची सांस्कृतिक ओळख असलेल्या भजन आणि भारूडाच्या कार्यक्रमांनी ठिय्या आंदोलनाचा पहिला दिवस संस्मरणीय ठरला आहे. उपरी येथील भजनी मंडळ, ह.भ.प. भगवान महाराज बागल, तसेच भारूडकार ह.भ.प. हरिभाऊ गाजरे, ह.भ.प. गोपाळ काथवटे,  यांच्यासह इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या गीतांजली मुंजाळ या बालिकेने भारूड सादर करून आंदोलकांना मंत्रमुग्ध केले.