Thu, Jun 27, 2019 17:55होमपेज › Solapur › दत्त महाराजांच्या जयघोषात प्रकटदिन मोठ्या उत्साहात

दत्त महाराजांच्या जयघोषात प्रकटदिन मोठ्या उत्साहात

Published On: Mar 19 2018 10:28PM | Last Updated: Mar 19 2018 10:06PMअक्कलकोट : वार्ताहर

‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात सोमवारी वटवृक्ष मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन साजरा करण्यात आला.
दरम्यान, सोमवारी (दि.19) पहाटे 5 वा. काकडा आरतीनंतर प्रकटदिनामुळे होणार्‍या भाविकांच्या गर्दीमुळे ‘श्रीं’चे दर्शन सुलभतेने होण्यासाठी भक्तांंचे नित्यनियमाने होणारे अभिषेक झाले नाहीत. जे भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना श्रीफळ व प्रसाद देवस्थानच्या वतीने देण्यात आला.

सकाळी 10 ते 12 यावेळेत देवस्थानच्या जोतिबा मंडपात सत्संग महिला मंडळाचा सालाबादाप्रमाणे भजन होऊन गुलाल व पुष्प वाहण्याच्या कार्यक्रमानंतर पाळण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी भजन, आरती झाली. त्यानंतर दुपारी 12 ते 2 यावेळेत देवस्थान समितीच्या मैंदर्गी रोडवरील भक्तनिवासात भोजन कक्ष येथे  भक्तांना प्रसाद म्हणून भोजन प्रसाद देण्यात आला.

सालाबादाप्रमाणे श्री स्वामी समर्थांचा प्रकटदिन ते पुण्यतिथीपर्यंत दररोज पहाटे 4 ते 5 यावेळेत श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर ते बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मठापर्यंत नामस्मरण करीत नगरप्रदिक्षणा होते. यामध्ये आबालवृध्द पुरुष, महिला, लहान मुले आदींचा यामध्ये समावेश असतो. याबरोबरच नित्य अनुष्ठान व धर्मसंकीर्तनाचा कार्यक्रम असतो.

महाप्रसादाचा घेतला लाभ

प्रकटदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले, कार्यकारी विश्‍वस्त अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था केलेली होती. नियमित होणार्‍या धार्मिक विधीनंतर भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. याकरिता विश्‍वस्त, सभासद, भक्तगण, सेवेकरी यांनी परिश्रम घेतले. मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ, दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र यासह बंगळुरु, बेळगाव, गोवा, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, गुराजत, मध्य प्रदेश, आदी राज्यांतून प्रकटदिनानिमित्त भक्तगण अक्कलकोट येथे दाखल झालेले होते.

प्रकटदिनानिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विलासराव फुटाणे, अ‍ॅड. प्रदीप झपके, विजय दास, दयानंद हिरेमठ, महेश गोगी, प्रा. संपतराव शिंदे, उज्ज्वला सरदेशमुख, नित्य अनुष्ठान व धर्मसंकीर्तन संयोजन संगीत अलंकार डॉ. हेरंबराज पाठक आदी उपस्थित होते.

भक्त, कर्मचारी धार्मिक कार्यक्रमांकरिता परिश्रम घेत आहेत.  बुधवार पेठेतील समाधी मठ येथे चोळप्पा यांच्या वंशजांनी प्रकटदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले. देवस्थानच्या जोतिबा मंडपात चिंचवड-पुणे येथील पंचमनिर्मित मिलिंद पोतदार व सहकारी यांचा सुमधूर भावभक्ती गीतांचा स्वरबहार कार्यक्रम सादर करण्यात आला.

 नगरपरिषदेसह देवस्थान समिती व अन्नछत्र मंडळाच्यावतीने उत्सवाच्या काळात विविध उपाययोजना करतात. मात्र राज्य सरकारकडून राज्यातील अन्य तीर्थक्षेत्रांप्रमाणे उत्सवाच्या काळात निधी मिळतो, तसा निधी मिळावा. या माध्यमातून आणखीन सुविधा भक्तांकरिता देता येणार आहेत. याबाबत राज्य सरकारने सकारात्मक विचार व्हावेत याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या तीर्थक्षेत्र विकास उच्चाधिकार समितीची बैठक लावून चौफेर विकास होण्याची मागणी शहरवासीयांतून होत आहे.