Tue, Mar 26, 2019 02:12होमपेज › Solapur › कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी खानापूरचे तलाठी निलंबित

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी खानापूरचे तलाठी निलंबित

Published On: May 09 2018 10:21PM | Last Updated: May 09 2018 9:03PMअक्कलकोट : वार्ताहर

अवैध वाळूसाठाप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्यामुळे खानापूर येथील गाव कामगार तलाठी ए. एच. शिंदे यांना  उपविभागीय अधिकारी क्र. 2 सोलापूर यांनी निलंबित केले आहे. याबरोबरच याप्रकरणी संबंधित मंडल अधिकारी, कोतवाल, पोलिस पाटील, ग्राम सुरक्षादल, सरपंच, ग्रामसेवक यांनाही जबाबदार धरण्यात आल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून खानापूर येथील भीमा नदीपात्रातून रोज अवैधरित्या 100 ते 150 ट्रॅक्टरव्दारे वाळूची तस्करी सुरु असल्याची तक्रार गावच्या सरपंचाने भ्रमणध्वनीव्दारे जिल्हाधिकार्‍यांना रविवारी कळविली होती.  प्रांताधिकारी यांच्या आदेशान्वये तहसीलच्या पथकाने याठिकाणी भेट दिली असता त्याठिकाणी 3 वाहने, 315 ब्रास वाळू खानापूर गावाच्या विविध भागांत आढळून आली. संबंधित  मंडल अधिकारी पारशे यांनी 7 मे रोजी तहसीलदार व प्रांताधिकारी  यांना दिली होती. संबंधित  गावचे तलाठी शिंदे यांनी भीमा नदीपात्रातून होणार्‍या अवैध वाळू उपशास अटकाव केला नाही. शिंदे यांना आजपासून शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले असून त्याबाबतची प्रत जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना पाठवली आहे. 

याप्रकरणी संबंधित मंडल अधिकारी  यांनी सुध्दा कामात  दुर्लक्ष केल्याचा ठपका  ठेवण्यात आला आहे. मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना असल्याने विभागीय चौकशीचा प्रस्ताव तयार करुन तसा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. याबरोबरच गावचे पोलिस पाटील, कोतवाल व ग्रामसुरक्षा समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांच्यावरही कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून या लोक पथकाच्या कारवाई दिवशी हजर नव्हते म्हणून त्यांच्यावरही कारवाईचा प्रस्ताव स्पष्ट अभिप्रायासह वरिष्ठांकडे सादर करण्याचे पत्र प्रांताधिकारी यांनी तहसीलदार यांना दिले आहे.