Mon, Aug 26, 2019 01:28होमपेज › Solapur › अजित पवार म्‍हणतात फेटा बांधणार नाही

अजित पवार म्‍हणतात फेटा बांधणार नाही

Published On: Apr 07 2018 11:06PM | Last Updated: Apr 07 2018 11:06PMसोलापूर : श्रीकांत साबळे

जोपर्यंत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येत नाही तोपर्यंत आपण डोक्यावर फेटा बांधणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. 

हल्लाबोल यात्रेनिमित्ताने सोलापूर जिल्हा दौर्‍यावर असलेले अजित पवार यांनी शुक्रवारी सायंकाळची सभा आटोपती घेत शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या निवासस्थानी पाहूणचार घेतला. ‘अतिथी देवो भव’ याप्रमाणे संतोष पवार यांच्या कुटुंबीयांनी अजित पवार यांच्यासमवेत असलेले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांंचेही स्वागत केले. यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी अजित पवार यांना फेटा बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फेटा बांधण्यास विनम्रपणे नकार दिला. त्यांनी तत्काळ मिश्किल भाषेत जोपर्यंत राज्यात आपली सत्ता येत नाही तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, अशी प्रतिज्ञा केल्याचे सांगत फेटा बांधून घेण्यास नकार दिला. 

याचवेळी उपस्थित असलेल्या तटकरे यांनाही कोकणातील संस्कृती आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे टिळा लावून घ्या, असे म्हणत कोटी केली. केंद्र आणि राज्यातील सध्याची राजकीय गणिते आणि जनमानसांमधील स्थितीचा अंदाज घेतल्यानंतर ‘अच्छे दिन’ वाल्यांच्या विरोधात थोडीशी नाराजी दिसून येत आहे. परंतु, या नाराजीचा राज्यात विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसर्‍या फळीतील नेते कशा पद्धतीने फायदा उठवितात आणि सत्तेच्या सत्तासंघर्षात खुर्ची मिळविण्यात कशा पद्धतीने यशस्वी होतात, हे पाहणे औचित्याचे ठरणार तर आहेच, पण महत्त्वाचे म्हणजे अजित पवार यांच्या डोक्यावर फेटा बांधण्यासाठी पुढची दीड वर्षे याच नेत्यांना आपला संघर्ष आणखी गतिमान करावा लागणार आहे.