Fri, Apr 26, 2019 04:03होमपेज › Solapur › सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

Published On: Apr 07 2018 11:06PM | Last Updated: Apr 07 2018 10:29PMटेंभुर्णी : प्रतिनिधी 

राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना शासन कायदा सुव्यवस्था, कर्जमाफी, शेतकर्‍यांचे प्रश्‍न, महिलांचे संरक्षण, विजेचा प्रश्‍न, साखरेचे धोरण या सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. यासाठी येणार्‍या सर्व निवडणुकांत राष्ट्रवादीचे उमेदवार व घड्याळाला विसरायचे नाही. बाकीची जबाबदारी माझ्यावर सोडा, तुमचे समाधान होईल असा निर्णय नाही घेतला तर अजित पवार पवाराची अवलाद सांगणार नाही, असा शब्द विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनेते आ. अजित पवार यांनी टेंभुर्णीतील हल्लाबोल आंदोलनावेळी उपस्थितांना दिला.
टेंभुर्णी येथे शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी आ. अजित पवार बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आ. बबनराव शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. संग्राम कोते-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस 

प्रदीप गारटकर, माजी आ. विनायक पाटील, बाळराजे पाटील, जि.प. सदस्य रणजितसिंह शिंदे, अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा  मंदा काळे, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा यशोदा ढवळे, प्रदीप सोळंकी, परिक्षित काळे, सभापती विक्रमसिंह शिंदे, संदीप वरपे, पं. स. सदस्य धनराज शिंदे, माजी उपसभापती तुकाराम ढवळे, भाई शिवाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब देशमुख यांच्यासह  अनेक मान्यवर उपस्थित होते.

 आ.  पवार म्हणाले की, ज्या ज्यावेळी शेतकरी अडचणीत आला त्या त्यावेळी खा. शरद पवार यांनी पॉलिसी बदलून शेतकर्‍यांना न्याय दिला. शेतकरी ताठ मानेने जगला पाहिजे ही भूमिका त्यांची होती. येथे धरण झाले, मागेल ती मदत करा, असे पवार यांचे सांगणे होते. यासाठी या जिल्ह्यात पाहिजे तेव्हा पाणी सोडले. जनावरे छावण्या, चारा दिला. या शासनाने शेणाचा भ्रष्टाचार केला म्हणून आरोप केला. यावर आ. अजित पवार म्हणाले की, ते एवढे कसे खालच्या दर्जाचे आहेत.

भाजपबद्दल बोलताना आ. अजित पवार म्हणाले, लोकांना फसवण्याची त्यांची  प्रवृत्ती आहे.जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी मागेल त्याला वीज कनेक्शन दिले आणि हे बघा पीक काढल्यानंतर म्हणतात आता पाणी घ्या. 

दोन्ही मंत्री बिनकामी

दोन्ही मंत्री भांडतात. यामुळे जिल्ह्याचे वाटोळे झाले आहे. या शब्दांत पालकमंत्री व सहकारमंत्री या दोन्ही मंत्र्यांवर आ. पवार यांनी टीका केली. अग्निशमनसाठी राखीव जागेवर बंगला बांधल्याचा आरोप केला.
मंत्री जळगावात अन् कालवा माढ्यात  
कालवा समितीचे अध्यक्ष जळगावात असल्याने ते कालवा समितीची मिटिंग कशी घेणार. यामुळे नियोजन चुकत असल्याची टीका आ. अजित पवार यांनी केली. ते म्हणाले की, पाणी खूप आहे. पाणी सोलापूरला पोहोचल्यावर नदीचे पाणी बंद करायला पाहिजे. पण नियोजनामुळे ते वेळेत बंद न केल्यामुळे हक्काचे पाणी कर्नाटकला वाहून जाते. कर्नाटकात बॅरजेस बसवून पाणी अडवितात, पण जिल्ह्यात पाणी अडविले जात नाही. यांना कळतच नाही. एवढे 110 टक्के धरण भरून खाली झाले आहे.
फसवी कर्जमाफी 
सभेत कर्जमाफी कुणाला झाली त्यांनी हात वर करा असे आ. अजित पवार यांनी म्हटले, पण एकानेही हात वर केला नाही. यावरून ही फसवी कर्जमाफी असल्याचे त्यांनी सांगितले.ज्याच्याकडे 3.5 लाख आहेत असे तुमच्या दारात कशाला येतील हे साधे यांना कळत नाही असा, आ. पवार यांनी सांगितले.

साखर धोरण चुकीचे 

ज्यावेळी परदेशात साखरेला चांगला दर होता, त्यावेळी साखर निर्यात केली नाही. आता बाहेर 2100 रुपये दर आहे. यामुळे प्रति टन राज्य शासनाने 500 व केंद्र शासनाने 500 रुपये अनुदान दिले पाहिजे. मग साखर बाहेर पाठवा. वीज, पेट्रोल, मजुरी, खते याचे दर वाढले. यामुळे उसाला दर मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले.

दुधात दरमहा 75 कोटी, उसात 85 कोटी तुम्हाला कमी मिळाले यामुळे हे हल्लाबोल आंदोलन आहे, असे आ. पवार म्हणाले. याठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडले कारण यांना कुठेतरी चिमटा बसतोय. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. पोलिसच मुळावर उठले आहेत. अश्‍विनी बिंद्रे, सांगलीच्या तरुणाची घटना अशा अनेक ठिकाणच्या पोलिस अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करून पोलिसांच्या अत्याचाराच्या घटनेमुळे कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यावर न्याय कुणाला मागायचा? मुख्यमंत्री फडणवीस व गृहराज्यमंत्री रणजित पाटील काय करतात, असा प्रश्‍न आ. अजित पवार यांनी केला.

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे बोलताना म्हणाले की, प. महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलनाचा चौथा टप्पा सुरू आहे. प्रतिसाद उत्तम मिळत आहे. पाचवा टप्पा संपेल तेव्हा राज्य सरकारही संपल्याशिवाय राहणार नाही. अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याने भाजप नेत्यांना झोपू देत नाही. हल्लाबोल आंदोलनाची शासनाने एवढी दहशत घेतली आहे की, खाताना, झोपताना यांना सारखी राष्ट्रवादी काँग्रेस दिसत आहे. 25 वर्षांत कमळाची पाकळीही दिसणार नाही. काही करायचे नाही पण संधी मिळाली की, राष्ट्रवादीवर टीका करायची एवढीच यांची कामगिरी आहे. 15 लाख आले का खात्यावर असे म्हणत मुंडे म्हणाले की, ललित मोदी 9-10 हजार कोटी, मल्या 10-15 हजार कोटी, निरव मोदी 25 हजार कोटी अशी स्थिती राहिली तर तुमच्या डोक्यावर 25 लाखांचा बोजा आल्याशिवाय राहणार नाही असे सांगत ‘अच्छे दिन’ आले का, असा सवाल केला.

आ. बबनराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये ते म्हणाले की, बारामती सोडली तर सर्व निवडणुकांत पूर्ण यश देणारा माढा तालुका असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम सुरू आहे. खा. पवार यांनी कारखाना दिला. अजित पवार यांनी उभारणीसाठी मदत केली.उसाचे 40 लाख मे. टनाचे तालुक्यात उत्पादन झाले आहे. सीना-माढा बोगदा, सीना-भीमा उपसासिंचन व कॅनॉलच्या माध्यमातून 70 टक्के ऊस लागवड झाली असल्याचे सांगितले. पाण्याच्या प्रत्येक पाळीस मिटिंग बोलवावी लागते. यामुळे एक मिटिंगमध्ये प्रश्‍न मिटविण्यासाठी प्रयत्न व्हावा.

 यावेळी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आ. संग्रामसिह कोते-पाटील, जि. प. सदस्य रणजितसिंह शिंदे आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन श्‍वेता हुल्ले व रविंद्र जाधव यांनी केले. आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे  विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी मानले. 

सभेस सर्व जि.प. सदस्य, पं. स. सदस्य, सर्व संस्थांचे पदाधिकारी, गावागावांतून आलेला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उन्हातही उपस्थित होता.