Thu, Apr 25, 2019 12:13होमपेज › Solapur › हल्लाबोल दरम्यान पवारांचे स्वकियांना खडेबोल

हल्लाबोल दरम्यान पवारांचे स्वकियांना खडेबोल

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 11:28PMमाढा : मदन चवरे

राष्ट्रवादीच्या वतीने माढा तालुक्यात आयोजित हल्लाबोल आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या विविध धोरणांवर सडकून टीका केली. तर स्वपक्षीयांना मागील चुकांबाबत जाहीरपणे खडेबोल सुनावले. मागील काळातील चुका पुन्हा न करण्याबाबत जाहीर ताकीदही दिली.

केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली आहे. हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून सरकार विरोधात वातावरण ढवळून काढण्याचे काम यानिमित्ताने होत आहे. या परिस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादीत मागील काळात काही चुका झाल्याची जाहीर वाच्यता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माढा तालुक्यात टेंभुर्णी व कुर्डुवाडी येथे झालेल्या सभेत केली. यावेळी ते म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांनी पक्षाच्या चिन्हावरच उभे राहिले पाहिजे होते. करमाळा विधानसभा मतदारसंघात अल्पशा मताने झालेल्या रश्मी बागल यांच्या पराभवाची सल त्यांच्या बोलण्यात जाणवली. रश्मी बागल निवडून आल्या असत्या तर विधानपरिषदेप्रमाणे विधानसभेतही राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता असला असता असे ते म्हणाले.

फक्त आपल्यापुरतं बघून चालणार नाही, तर पक्ष म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. माढा, माळशिरस, मोहोळ, बार्शी याठिकाणी आमदार निवडून येऊन चालणार नाहीत, तर जास्तीत जास्त विधानसभा व लोकसभेत पक्षाचे प्रतिनिधी निवडून आले पाहिजेत. घर मोठे झाल्यावर भांड्याला भांडं लागतं, महत्त्वाकांक्षा वाढतात, त्यावर चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. तुमचे मिटत नसेल तर मी आहे, माझ्याकडून मिटले नाही तर दिल्लीत पवारसाहेब आहेत, असे ते म्हणाले. पण याबाबत त्यांचा नेमका रोख कोणाकडे होता, यावर मात्र संभ्रम कायम राहिला. कुर्डुवाडी येथील भर पावसात झालेल्या सभेत पुन्हा त्यांनी हाच धागा पकडून जि.प. चे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांना जाहीरपणे काही आगळीक केली तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम देत आता इतरांची नावे घेत नाही, असे म्हणत सूचक इशारा दिला.

अजित पवार हे भावी मुख्यमंत्री : मोहिते-पाटील 
टेंभुर्णी येथील सभेत खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राज्याचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. यानंतर उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. पवार मोहिते यांचे शीतयुद्ध संपल्याची चर्चा यानंतर सभेच्या ठिकाणी रंगली होती.

एकच वादा बबनदादा : पवार
आ. अजित पवार भाषणाला उभा राहताच ‘एकच वादा..’ अशा घोषणा सुरु झाल्या, त्यावेळी अजित पवार यांनी ‘एकच वादा बबनदादा’ अशी घोषणा दिली. यावेळी त्यांनी आ. बबनदादा यांच्या कार्याचा व पवारसाहेबांविषयीच्या निष्ठेचा उल्लेख केला. कोणालाही न दुखवता आपले काम करुन घेणारा म्हणून सातत्याने निवडून येणारा आमदार, अशी स्तुतीसुमनेही त्यांच्यावर उधळली. त्यांच्या कार्यामुळेच विठ्ठलराव शिंदे कारखान्याने राज्यात एक नंबरचे गाळप केले असल्याचे पवार म्हणाले.