Tue, Mar 19, 2019 15:34होमपेज › Solapur › सत्तेत बसत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही : अजितदादा

सत्तेत बसत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही : अजितदादा

Published On: Apr 07 2018 8:24AM | Last Updated: Apr 07 2018 8:24AMसोलापूर : श्रीकांत साबळे

जोपर्यंत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येत नाही, तोपर्यंत आपण डोक्यावर फेटा बांधणार नाही. अशी भीष्मप्रतिज्ञा कुणी दुसऱ्या-तिसर्‍याने केली नाही तर ती केली आहे खुद्दा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी. 

हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असलेले अजितदादा यांनी शुक्रवारी सायंकाळची सभा आटोपत शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या निवासस्थानी पाहुणचार घेतला. अतिथीदेवो भव याप्रमाणे संतोष पवार यांच्या कुटुबियांनी अजितदादा यांच्यासमवेत असलेले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचेही स्वागत केले. यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांनी अजितदादांना फेटा घालण्याचा प्रयत्न केला, पण फटकळ ते अजितदादा कुठले...त्यांनी तात्काळ मिश्किल भाषेत "जोपर्यंत राज्यात आपली सत्ता येत नाही तोपर्यत आपण फेटा बांधणार नाही" अशी भीष्मप्रतिज्ञा केल्याचे सांगत फेटा बांधून घेण्यास नकार दिला. तर याचवेळी उपस्थित असलेल्या तटकरे यांनाही कोकणातील संस्कृती आणि पश्चिम महाराष्ट्रातील संस्कृती वेगळी आहे...त्यामुळे टिळा लावून घ्या, असे म्हणत कोटी केली. अजितदादांच्या भीष्मप्रतिज्ञेनंतर उपस्थितांनीही आपल्या माना डोलवित "होय महाराजा"ची साद दिली. 

केंद्र आणि राज्यातील सध्याची राजकीय गणिते आणि जनमाणसांमधील स्थितीचा अंदाज घेतल्यानंतर "अच्छे दिन " वाल्यांच्या विरोधात थोडीशी नाराजी दिसून येत आहे, परंतु, या नाराजीचा राज्यात विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या फळीतील नेते कशा पद्धतीने फायदा उठवितात आणि त्याचे सत्तेच्या सत्तासंघर्षात खुर्ची मिळविण्यात कशा पध्दतीने यशस्वी होतात? हे पाहणे औचित्याचे ठरणार तर आहेच पण, महत्त्वाचे म्हणजे अजितदादांच्या डोक्यावर फेटा बांधण्यासाठी पुढची दीड वर्षे याच नेत्यांना आपला संघर्ष आणखी गतीमान करावा लागेल, हे मात्र निश्चित.

Tags : ajit pawar, NCP, solapur, solapur news