Thu, Jun 27, 2019 13:43होमपेज › Solapur › कृषी महोत्सवाची पताका अशीच फडकत रहावी

कृषी महोत्सवाची पताका अशीच फडकत रहावी

Published On: Mar 19 2018 1:49AM | Last Updated: Mar 18 2018 10:01PMटिपणी : संतोष आचलारे 

राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने गत आठवड्यात सलग पाच दिवस सोलापुरातील होम मैदानावर कृषी महोत्सव भरवून कृषी विकासाच्या मार्गाला खतपाणी घालण्याचे मोलाचे काम केले. या उपक्रमासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड व सर्व कृषी अधिकार्‍यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरल्याने ते कौतुकास पात्र ठरले आहेत. या महोत्सवात शेतकर्‍यांना शेतीच्या नवीन तंत्राविषयी, वाणाविषयी व बियाणांविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. विषमुक्‍त शेती अभियानांतर्गत काही शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या कृषी उत्पादनांची माहितीही या माध्यमातून समोर आली. याशिवाय शेतकर्‍यांसाठी राज्य शासनाच्या कोणत्या योजना आहेत, सिंचनासाठी काय सुविधा आहेत, याचीही माहिती या महोत्सवाच्या माध्यमातून मिळाली गेली.

त्यामुळे या महोत्सवाचा निश्‍चितच चांगला परिणाम होईल यात शंका नाही. कृषी महोत्सवात काही खासगी कंपन्यांकडून व प्रयोगशिल शेतकर्‍यांकडून विविध अत्याधुनिक उपकरणे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. अत्यंत रास्त दरात शेतीच्या कामांसाठी उपयोगी पडणारे विविध मशीन याठिकाणी उपलब्ध होते. शासकीय योजनांची सांगड घालून या मशीन शेतकर्‍यांना मिळवून देण्यासाठी प्रशासनाने आता पुढाकार घेणे गरजेचे आहे. याच प्रदर्शनात गवत कापणी करणे, ज्वारी, गहू , ऊस काढणी करणे आदी प्रकारची बहुउपयोगी मशीन वीस हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे दिसून आले. अलीकडच्या काळात शेतकर्‍यांना मजूर मिळणे अवघड झाले आहे.

मजूरांवर शेती व्यवसाय करणे आता अत्यंत कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना या मशीन जिल्हा परिषद किंवा राज्य शासनाच्या कृषी खात्याकडून अनुदानावर मिळवून देण्याचे काम आता प्रशासकीय यंत्रणेला करावे लागणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, कृषी व पशुसवंर्धन समितीचे सभापती मल्‍लिकार्जुन पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दरवर्षी शेतकर्‍यांना पाणबुडी मोटार व कडबाकुट्टी मशीन मोठ्या प्रमाणावर अनुदानावर देण्यात येतात. यंदाच्या नव्या आर्थिक वर्षापासून शेतकर्‍यांना मजूरांशिवाय शेती कसता येण्यासाठी व उत्पादन खर्च कमी करणारी अवजारे शेतकर्‍यांना अनुदानावर मिळाली तर खर्‍या अर्थाने कृषी महोत्सवाची पताका फडकली गेली असेच होणार आहे.

विषमुक्‍त शेतीसाठी अनेक शेतकर्‍यांनी रासायनिक घटकांना फाटा देत बियाणे, खते विकसीत केले आहे. या तंत्राचाही वापर शेतकर्‍यांत वाढावा यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाच दिवसाच्या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने झालेले मंथन व कृषी उन्‍नतीची ही गाथा पुढे सरकवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची सकारात्मकता अत्यंत निर्णायक ठरणारी आहे.