Fri, Apr 19, 2019 11:59होमपेज › Solapur › पहिली पत्नी असताना अल्पवयीन मुलीशी दुसरे लग्न करणाऱ्या पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल 

पहिली पत्नी असताना अल्पवयीन मुलीशी दुसरे लग्न करणाऱ्या पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल 

Published On: Sep 07 2018 9:49PM | Last Updated: Sep 07 2018 9:49PM 

मोहोळ : वार्ताहर 

पहिली पत्नी असताना पतीने एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी लग्न केले. ही घटना ०२ जुलै रोजी मोहोळ तालुक्यातील बिटले येथील मोकाई मंदिरात घडली. या प्रकरणी मोहोळ पोलीसात ०७ सप्टेंबर रोजी पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिवकन्या रमेश चोरमले आणि रमेश शंकर चोरमले(दोघे रा.ढोराळे ता. बार्शी) यांचे लग्न सन २०१३ मध्ये झाले होते. शिवकन्या यांना लग्ना नंतर दोन तीन महिने सासरच्या लोकांनी व्यवस्थित नांदविले. त्यानंतर पैशाची मागणी करुन त्यांना शारीरीक मानसिक त्रास करण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्रासाला कंटाळून शिवकन्या चोरमले सन २०१४ पासून माहेरी (उंडेगाव ता. बार्शी) येथे राहत आहेत. दरम्यान रमेश शंकर चोरमले याने मैनाबाई शंकर चोरमले, शंकर पंढरी चोरमले (रा.ढोराळे ता.बार्शी) यांच्यासह काळेवाडी ता. मोहोळ येथील खंडू महादेव खताळ आणि ताई महादेव खताळ यांच्याशी संगणमत केले. आणि ०२ जुलै २०१८ रोजी त्यांची १५ वर्षाची अल्पवयीन मुलगी स्वाती खताळ हिच्याशी बिटले ता. मोहोळ येथील मोकाई मंदिरात लग्न केले आहे. अशा आशयाची फिर्याद शिवकन्या चोरमले यांनी दिली आहे.

त्यानुसार मोहोळ पोलीसात ०७ सप्टेंबर रोजी रमेश शंकर चोरमले, मैनाबाई शंकर चोरमले, शंकर पंढरी चोरमले (रा.ढोराळे ता.बार्शी), खंडू महादेव खताळ, ताई महादेव खताळ (काळेवाडी ता. मोहोळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक झाली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हंचे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.