Thu, Jan 17, 2019 17:11होमपेज › Solapur › नारी येथे पाच जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल 

नारी येथे पाच जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल 

Published On: Mar 07 2018 11:19PM | Last Updated: Mar 07 2018 11:04PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

टीव्ही खरेदीच्या पैशाच्या कारणावरून पाच जणांनी चौघांना काठी, चाबुक व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी करत जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना नारी (ता. बार्शी) येथे घडली. याप्रकरणी पाच जणांवर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे.

आकाश धोंडिबा झोंबाडे (वय 19, रा. नारी, ता. बार्शी) या तरुणाने याबाबत पांगरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. नितीन  अरुण बदाले, ज्ञानेश्‍वर मोहन बदाले, मोहन दगडू बदाले, हिराबाई मोहन बदाले व शीतल नितीन बदाले (सर्व रा. नारी) अशी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

झोंबाडे याने पांगरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तो गावातील सुरेश पाटील यांच्या किराणा दुकानासमोर लावलेल्या टँकरमधील पाणी आणण्यासाठी आपल्या दुचाकीवरून गेला होता.दरम्यान, तेथे नितीन बदाले याने येऊन फिर्यादीस तुझ्या भावाने घेतलेल्या टीव्हीचे 1500 रुपये कधी देणार, असे विचारले. तेव्हा फिर्यादी झोंबाडे याने मला तुझे पैसे माहीत नाहीत, तुमचे तुम्ही बघा असे सांगितले. त्यामुळे नितीन याने चिडून फिर्यादीस मारहाण केली. आई, सासू व पत्नी भांडणे सोडवण्यासाठी मध्ये आली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करत फिर्यादीची दुचाकी लावून घेतली. याबाबत झोंबाडे याने दिलेल्या फिर्यादीवरून पांगरी पोलिसांत पाच जणांवर जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे हे करत आहेत.