Sat, Aug 24, 2019 00:05होमपेज › Solapur › ‘कृष्णा’चे फक्‍त हृदय पुन्हा नाही धडधडणार

‘कृष्णा’चे फक्‍त हृदय पुन्हा नाही धडधडणार

Published On: Jun 07 2018 11:02PM | Last Updated: Jun 07 2018 10:27PMसोलापूर : प्रतिनिधी

अपघातामुळे ब्रेनडेड झालेल्या कृष्णाहरी बोम्मा यांच्या यकृत व दोन्ही किडन्या प्रत्यारोपणाने तिघांना जीवदान मिळाले. परंतु, सोलापुरातील ढगाळ वातावरणामुळे एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध न झाल्याने ‘कृष्णा’ यांचे फक्‍त हृदयच प्रत्यारोपणासाठी वापरात न आल्याने ते पुन्हा धडधडणार नसल्याची शोकांतिका आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी ब्रेनडेड रुग्णाच्या अवयवदानासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ निर्माण करण्यात आला होता. या मोहिमेत पुण्यातील रुबी रुग्णालयाला एक यकृत, तर सोलापुरातील अश्‍विनी रुग्णालय व  कुंभारीतील अश्‍विनी ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयास प्रत्येकी एक किडनी अशा दोन किडनी देण्यात आल्या. 

मंगळवार, 5 जून रोजी नवीन विडी घरकुल परिसरातील कृष्णाहरी सातय्या बोम्मा (वय 46) यांना रिक्षाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. विविध तपासण्या केल्यानंतर त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान झाले. त्यांच्या मेंदूला रक्‍तपुरवठा होत नव्हता. त्यांना व्हेंटिलेटलवर ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 11 वाजता त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. कृष्णाहरी बोम्मा यांच्या पश्‍चात अक्षय व राहुल ही दोन मुले असून ही दोन्ही मुले पुणे येथे बी-फार्मसीचे शिक्षण घेत आहेत.

कुटुंबीयांचे समुपदेशन
ब्रेनडेड झाल्याचे समजताच बोम्मा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र अशाही अवस्थेत सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण गुर्रम यांनी बोम्मा कुटुंबीयांचे समुपदेशन केले. अवयवदान केल्यास काही रुग्णांचे प्राण वाचतील, हे पटवून दिले. बोम्मा कुटुंबीयांनी याला प्रतिसाद देत अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

ग्रीन कॉरिडॉरद्वारे अवयव रवाना
सकाळी दहापासूनच शासकीय रुग्णालयात अवयवदानासाठी ग्रीन कॉरिडॉरची तयारी करण्यात आली होती. अकराच्या सुमारास वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पथकाने या प्रक्रियेस सुरुवात केली. ही प्रक्रिया तब्बल तीन तास चालली. 

तीन रुग्णांचे वाचणार प्राण
या अवयवदानातून तीन रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. पुण्यातील रुबी रुग्णालयाला एक यकृत, तर सोलापुरातील अश्‍विनी रुग्णालय व  कुंभारीतील अश्‍विनी ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयास प्रत्येकी एक किडन्या देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयास दोन डोळे व त्वचा दान करण्यात आली.  

नातेवाईकांकडून साश्रूनयनांनी निरोप
पहाटेपासूनच शासकीय रुग्णालयात पूर्व भागातील नातेवाईकांनी गर्दी केली होती. अवयव ठेवलेल्या पेट्या नेताना नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. बोम्मा यांच्या दोन्ही सुपुत्रांना हुंदका आवरता आला नाही. मात्र त्यांनी मोठ्या संयमाने या अवयवदानाच्या प्रक्रियेला मदत केली. 

वीस वैद्यकीय अधिकारी कर्मचार्‍यांचे पथक
या ग्रीन कॉरिडॉर मोहिमेत शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्स, कर्मचारी, सहाय्यक अशा वीसहून अधिकजणांचा समावेश असलेल्या पथकाने सहभाग नोंदविला. छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे हे स्वतः या सर्व प्रक्रियांचा आढावा घेत होते. 

अवयवदानाची सातवी वेळ
शासकीय व खासगी रुग्णालये तसेच विविध सामाजिक संस्थातर्फे अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात प्रबोधन होत असल्याने अवयवदानासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. अवयवदानाची ही सातवी वेळ होती. यापूर्वी अश्‍विनी रुग्णालय, यशोधरा रुग्णालय तसेच छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात ग्रीन कॉरिडॉरद्वारे अवयवदान प्रक्रिया पार पडली आहे. 

चोख पोलिस बंदोबस्त
या ग्रीन कॉरिडॉरसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 5 पोलिस निरीक्षक तसेच 20 पोलिस कर्मचार्‍यांचा फौजफाटा नेमण्यात आला होता. रुबी रुग्णालयाकडे जाणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्सला वरवडे टोलनाक्यापर्यंत पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. शिवाय कुंभारीतील अश्‍विनी रुग्णालयाकडे अवयव नेतानाही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून अ‍ॅम्ब्युलन्सला मार्ग मोकळा करुन दिला. 

भाऊ गेला, मात्र ज्यांना अवयवांची गरज आहे त्यांना जीवदान मिळावे, याच हेतूने भावाच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय आम्ही घेतला. कृष्णाहरी बोम्मा यांचे डोळे, त्वचा, यकृत, किडनी हे अवयव दान करण्यात आले आहेत. जीवदान मिळालेल्यांच्या रूपाने माझ्या भावाच्या स्मृती कायम राहतील.
   - यादगिरी सातय्या बोम्मा
(कृष्णाहरी बोम्मा यांचे बंधू)