Wed, Jul 24, 2019 12:57होमपेज › Solapur › राज्यभरात 16 जुलैपासून दूध आंदोलन पेटणार

राज्यभरात 16 जुलैपासून दूध आंदोलन पेटणार

Published On: Jul 05 2018 1:41AM | Last Updated: Jul 04 2018 10:32PMसोलापूर : प्रतिनिधी
दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान  द्यावे आणि उसाची थकलेली दोन हजार कोटी रुपयांची एफआरपी त्वरित द्यावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकरी 16 जुलैपासून दूधपुरवठा रोखतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. 

राज्यात गाईच्या दुधाचे एक कोटी पाच लाख लिटरच्या आसपास संकलन होते, तर दूध संघाला प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्यात आले आहे; मात्र दूध संघाने ते अन्यत्र वळवले आहे. या प्रकरणी प्रत्यक्ष दूध उत्पादक किंवा राज्य सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान थेट जमा करावे, अशी मागणी खा. शेट्टी यांनी केली आहे. कर्नाटकच्या धर्तीवर शेतकर्‍यांच्या बँक खात्यांत हे अनुदान थेट जमा करावे, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. यापूर्वी पुण्यात यासाठी आंदोलन केले गेले होते; परंतु सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे 16 जुलैपासून कोणताही शेतकरी दूध विकणार नाही. डेअरी मालकाला दूध पाहिजे असल्यास शेतकर्‍यांच्या दारापर्यंत जाऊन विनंती करून मोफत दूध घेऊन जावे, असे खा. शेट्टींनी सांगितले. सोबतच ऊस उत्पादक शेतकर्‍यांची दोन हजार कोटी रुपयांची एफआरपी थकलेली आहे तीही ताबडतोब द्यावी, असेही खा. शेट्टी यांनी सांगितले.

छोटे शेतकरी हे दुधाच्या व्यवसायात गुंतलेले आहेत. त्यांना दुधाच्या व्यवसायाशिवाय उपजीविकेचे कोणतेही साधन नाही. दुधाला योग्य हमीभाव मिळालाच पाहिजे, अशी शेतकरी संघटनेचे भूमिका आहे. सरकारने पीक कर्जाची घोषणा करुन एक वर्ष संपायला आले तरीही आजदेखील शेतकरीवर्ग कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलेला आहे. सरकारकडून शेतकर्‍यांना दीडपट हमीभाव देण्याची घोषणा ही फक्त घोषणाच आहे. येत्या 16 जुलैपासून दूध आंदोलनाची सुरुवात होणार आहे. 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून हे बेमुदत आंदोलन सुरु होईल, असेही खा. शेट्टी यांनी सांगितले. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवरच खा. शेट्टी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात दौरे करत आहे. बुधवारी त्यांनी सोलापूरच्या दौर्‍यावेळी पत्रकारांशी संवाद साधून यासंदर्भात माहिती दिली. दूध आंदोलनावेळी गरज पडल्यास कायदा हातात घेण्यास पुढेमागे बघणार नसल्याचा इशाराही त्यांनी याप्रसंगी दिला आहे.