Sat, Apr 20, 2019 07:56होमपेज › Solapur › निधीच्या वाटपावरून वाद पेटला

निधीच्या वाटपावरून वाद पेटला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत सोमवारी दुपारी यशवंतराव सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अंदाजपत्रकीय सभेत माढा विरुद्ध माळशिरस असा वाद जि.प. सदस्यांच्या विकास निधीवरून उफाळला. या प्रश्‍नावरून सलग दोन सभांत टार्गेट करण्याचा प्रत्यन होत असल्याने जि.प. अध्यक्ष शिंदे चिडले. निधी वाटपाच्या विषयावरून राजकारण होणार असेल तर मीही माझ्या पद्धतीने निधी वाटप करतो, मी काय साधू, संतांच्या घरात जन्माला आलो नाही, मागील सर्व अनुशेष भरून काढीन, असा टोला त्यांनी यावेळी माळशिरसच्या सदस्यांना लगावला. 

जि.प. सदस्य त्रिभुवन धाईंजे यांनी जि.प. सदस्यांना नियमाने 8 लाख रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. असे असतानाही केवळ 6 लाख रुपयांचा निधी मिळत आहे. जि.प. अध्यक्ष व सभापती यांच्यासाठी 30 टक्के निधी जादा देण्यात आला आहे, यासाठी आमची हरकत नाही; मात्र तरीही निधी कमी मिळत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गत सर्वसाधारण सभेत याच विषयावरून वाद झाला होता. हा विषय सभेत न आणता सर्व सदस्यांनी एकत्रित बसून यावर निर्णय घेऊ असा निर्णय त्यावेळी अध्यक्ष शिंदे यांनी घेतला होता. यास सर्व सदस्यांनी समती दिली होती. त्यानंतर आजच्या सभेत पुन्हा हा विषय वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आल्याने अध्यक्ष शिंदे हे चांगलेच संतापले. 

मागील 15 वर्षांत कोणत्या तालुक्याला जास्त निधी गेला आहे, मला माहीत आहे. नियमाने निधी देण्यास सुरुवात केली, तर पाच वर्षांत दमडीही मिळणार नाही, अशी अप्रत्यक्ष समज त्यांनी यावेळी माळशिरसकरांना दिला. शेवटी याप्रकरणी सभागृहातील जेष्ठ सदस्य काका साठे यांनी मध्यस्थी करुन हा वाद शांत केला. पंचायत राज समितीच्या दौर्‍याप्रसंगी जि.प.सेस फंडातून 25 लाख रुपयांचा निधी मागील सभेची मंजूरी घेउन खर्च दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने या विषयावर जि.प.सदस्य उमेश पाटील यांनी अध्यक्ष व सीईओ यांना चांगलेच धारेवर धरले. जि.प.सेस फंडातील निधी यासाठी मी खर्च होउ देणार नाही अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली. यावर हा निधी अजून खर्च झाला नसून पुढच्या सभेत यावर निर्णय घेण्याचे ठरले. संगणक परिचालकांनाही सेस फंडातून प्रशिक्षण देण्यासाठी 2 कोटी 20 लाखाचा विनाकारण खर्च झाला असून हा निधी वसूल करण्याची मागणी पाटील यांनी केली. 

शिक्षकांच्या प्रश्‍नाबाबत सातत्याने सभेत प्रश्‍न उपस्थित होत असल्याने व उमेश पाटील यांच्याकडून याबाबत अधिक वेळ घेतला जात असल्याने जि.प.अध्यक्ष शिंदे पुन्हा पाटील यांच्यावर चिडले. तुम्ही शिक्षकांचे प्रतिनिधी की जनतेचे प्रतिनिधी असा प्रश्‍न त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावरुन पुन्हा दोघांत खडाजंगी झाली. समाजकल्याण विभागाच्या कारभारावरुन सभेत पुन्हा वादळ उठले. समाजकल्याण विभागातील कारभार तातडीने सुधारुन समाजकल्याण अधिकारी विजय लोंढे, सामाजिक वैदयकीय कार्यकर्त्या साधना कांबळे यांना या पदावरुन हटवून या विभागात पारदर्शकता आणण्याची मागणी सदस्यांनी केली. पंढरपूर तालुक्यातील टाकळी व तिसंगी  येथील ग्रामसेवकांनी केलेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी यावेळी प्रा. सुभाष माने यांनी केली. ग्रामसेवक हे तुमचे बगल बच्चे आहेत का असा प्रश्‍नही त्यांनी थेट विचारल्याने जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारुड हे संतापले. 

Tags : Solapur, Solapur News, administration, Department of Social Welfare, meeting


  •