Mon, Aug 19, 2019 00:41होमपेज › Solapur › आदिती जिल्ह्यात प्रथम

आदिती जिल्ह्यात प्रथम

Published On: Jun 09 2018 1:37AM | Last Updated: Jun 08 2018 11:52PMसोलापूर ः प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर झाला. सोलापूर जिल्ह्याचा निकाल 92.27 टक्के लागला. इयत्ता बारावीप्रमाणे दहावीच्या निकालामध्येही जिल्ह्यात मुलींचीच सरशी दिसून आली. जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान इंडियन मॉडेल स्कूलच्या आदिती कोठावळे (99.80 टक्के) हिने पटकावला आहे. 

जिल्ह्यात एकूण 940 माध्यमिक शाळा आहेत. या शाळांतील एकूण 65 हजार 881 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 60 हजार 789 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याचे हे प्रमाण 92. 27 टक्के इतके आहे.

परीक्षा दिलेल्या एकूण 37 हजार 220 मुलांपैकी 33 हजार 618 मुले उत्तीर्ण झाली आहेत. उत्तीर्ण होण्याचे मुलांचे प्रमाण 90.32 टक्के इतके आहे. परीक्षा दिलेल्या एकूण 28 हजार 661 मुलींपैकी 27 हजार 171 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींचे  उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.80 टक्के असे आहे. 

या परीक्षेत विशेष श्रेणीमध्ये 16 हजार 728, प्रथम श्रेणीत 22 हजार 763, द्वितीय श्रेणीत 17 हजार 759, तर उत्तीर्ण श्रेणीत 3 हजार 839 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 277 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे गतवर्षीही दहावीचा जिल्ह्याचा 92.47 टक्के इतका निकाल लागला होता. म्हणजे निकालाच्या टक्केवारीत फारसी वाढ अथवा घसरण यंदा झालेली नाही.

गुणपडताळणीसाठी 9 ते 18 जूनदरम्यान अर्ज करता येणार आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतींसाठी 9 ते 18 जूनदरम्यान अर्ज करता येईल. तसेच उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत 28 जूनपर्यंत आहे. सर्व विषयांत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी 2 संधी मिळणार आहेत. जुलै-ऑगस्ट 2018 आणि मार्च 2019 मध्ये होणारी परीक्षा त्यांना श्रेणी सुधारण्यासाठी देता येईल.

201 शाळांचा निकाल 100 टक्के

जिल्ह्यातील तब्बल 201 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये सोलापूर शहर, उत्तर व दक्षिण तालुका- 67, माढा- 27, बार्शी- 26, अक्कलकोट- 18, सांगोला- 15, पंढरपूर- 12, मंगळवेढा- 12, मोहोळ- 11, माळशिरस 8 आणि करमाळा तालुक्यातील 5 शाळांचा समावेश आहे.

रिपिटरचा निकाल 52.21 टक्के

दहावीचा रिपिटरचा जिल्ह्याचा निकाल यंदा 52.21 टक्के लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातून यंदा 3 हजार 277 रिपिटर विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यामध्ये 2 हजार 414 मुले आणि 863 मुलींचा समावेश होता. यातील 1 हजार 211 मुले आणि 500 मुली असे एकूण 1 हजार 711 पुनर्परीक्षार्थी  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
निकाल पाहण्यासाठी झुंबड

निकाल पाहण्यासाठी शहरातील विविध नेटकॅफेमध्ये विद्यार्थी व पालकांची झुंबड उडाली होती. शिवाय अनेक पालकांनी मोबाईलद्वारेही आपल्या पाल्यांचा निकाल पाहिला. उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी पेढे भरवून जल्लोष केला.