Tue, Jul 16, 2019 21:59होमपेज › Solapur › अधटरावच्या बडतर्फीचे अधिकार शासनाला   

अधटरावच्या बडतर्फीचे अधिकार शासनाला   

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 10:03PMपंढरपूर :  प्रतिनिधी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांच्या गैरवर्तनामुळे गेल्या वर्षभरात अनेक वेळा विठ्ठल देवस्थान राज्यभरात बदनाम झालेले आहे. त्यांच्या या गैरवर्तनाबाबत कारवाईचे अधिकार राज्य शासनाकडेच आहेत. त्यामुळे एकतर राज्य शासन अधटराव यांना समितीमधून काढून टाकते की, प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निलंबित करते, यावरच अधटराव यांचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, सचिन अधटराव याला दि. 4 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
 रविवार, दि. 8 रोजी मंदिर समितीची मासिक बैठक होत असून त्या बैठकीत समिती जो निर्णय घेईल त्या निर्णयानुसारही राज्य सरकार कारवाई करेल, अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे. 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांनी दर्शन पासचा काळाबाजार करून भाविकांची फसवणूक केल्याचा गुन्हा पंढरपूर शहर पोलिसांत दाखल असून, सध्या अधटराव यांच्यासह अन्य दोन संशयित आरोपी पोलिस कोठडीत आहेत. या प्रकारामुळे विठ्ठलाच्या दर्शनाचा काळाबाजार चव्हाट्यावर आला असून, देवस्थानची नाहक बदनामी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर नियुक्तीपासून सातत्याने वादग्रस्त ठरलेले सदस्य सचिन अधटराव यांना बडतर्फ करण्याची मागणी होऊ लागली आहे. यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासल्या असता अधटराव यांची नियुक्ती राज्य शासनाने अध्यादेश काढून केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकारी जिल्हाधिकारी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती अध्यक्ष यांनाही  नाहीत. 

एखाद्या सदस्याने गैरवर्तन केल्यास दोन तृतीयांश बहुमताने सदर सदस्यांच्या बडतर्फीची शिफारस  मंदिर अधिनियम कलम 26 (1) नुसार राज्य सरकारकडे करता येते. अशी शिफारस केल्यानंतर संबंधित सदस्यास बडतर्फ केले जाईल. आपले म्हणणे मांडण्याचाही अधिकार असून या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सदस्यास निलंबित करण्याची तरतूद मंदिर अधिनियमात आहेत. त्यानुसार राज्य सरकारने कारवाई केल्यास सदस्यास न्यायालयातही दाद मागता येणार नाही. त्यामुळे आता सचिन अधटराव यांच्या सदस्यत्वाबाबत मंदिर समिती किंवा राज्य सरकारच निर्णय घेऊ शकणार आहे. येत्या 8 सप्टेंबर रोजी मंदिर समितीची मासिक बैठक आयोजित करण्यात आली असून त्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.