Tue, May 21, 2019 00:08होमपेज › Solapur › आमिष दाखवून लुटणारी खोट्या पॉलिसीधारकांची टोळी सक्रिय 

आमिष दाखवून लुटणारी खोट्या पॉलिसीधारकांची टोळी सक्रिय 

Published On: Aug 08 2018 10:31PM | Last Updated: Aug 08 2018 10:08PMगुन्हेगारी विश्‍व : रामकृष्ण लांबतुरे 

सावधान...! खोट्या माहितीच्या, कमी वेळेत जादा पैसे मिळणार असल्याचा शॉर्टकट सांगून, आमिषाचा भडीमार करुन खोट्या पॉलिसी विकणार्‍या खोट्या एजंटांची टोळी सक्रिय झाली आहे.  नुकतचे यासंदर्भात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात आरोपीचा पत्ता, पूर्ण नाव माहिती नसल्याची फिर्यादीत नोंद आहे. थोडक्यात आपल्या कष्टाच्या कमाईविषयी आपण किती जागरुक असतो, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. 

पोटाला चिमटा घेऊन पुढील काळ सुकर जाण्यासाठी, धोक्याच्या वेळेस आर्थिक मदत मिळावी या अपेक्षेपोटी कष्टकरी व्यक्‍ती विविध कंपन्यांच्या पॉलिसीमध्ये  आपली स्वकष्टाची कमाई गुंतवतो. मात्र गुंतवणूक करताना शॉर्टकटचा वापर करुन, खोट्या आमिषाला बळी पडून अनोळखी, माहिती, पत्ता नसलेल्या व्यक्‍तीवर विश्‍वास  ठेवून पॉलिसीत पैसे गुंतवतो. यातूनच  फसवणुकीचा प्रकार होतो. याला वैद्यकीय प्रतिनिधी, एमआर, डॉक्टर, शिक्षक असे उच्चशिक्षित बळी पडतात, याबाबत आश्‍चर्य वाटते.

संबंधितांनी गुन्हा दाखल केल्याने  हा प्रकार उघडकीस आला आहे. जे मन मारुन, स्वतःचीच मनधरणी करुन उद्या पैसा मिळेल म्हणून खोट्या आशेपोटी घरीच बसलेल्यांची संख्या मोठी आहे.  प्रत्येकांनी गुंतवणूक करताना कंपनीच्या अधिकृत एजंटाकडून पूर्ण माहिती मिळवून, टोल फ्री कॉलवर विचारणा करुनच पॉलिसीत गुंतवणूक करावी. आपला रिनीव्हलचा हप्ता, तारीख, मॅच्युरिटीची तारीख, प्रोसेसिंग फी याविषयीच्या नोंदी करुन ठेवणे गरजेचे आहे. 

ऑनलाईनच्या दुनियेत चोरट्यांनीही व्हाईटकॉलर धंद्याचा मार्ग अवलंबला आहे. आता हत्यारी गुन्हे करुन इजा पोचवून जितका लाभ मिळत नाही तितका फायदा या व्हाईटकॉलर गुन्ह्यात होत असल्याने यातच टोळी सक्रिय झाली आहे.  त्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी,  पैसा कष्टाचा असला तरच तो पोलिसाची पायरी चढतो. त्यात  गुन्हेगार मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, नोएडास्थित असल्याने तपासातही दिरंगाई, यामुळे गुन्हेगारांचे फावते.  पॉलिसी क्रमांकावरुन नंबर शोधून  मोबाईलवरुन  फोन करुन छानपैकी हिंदी, इंग्रजी झाडून माहिती विचारली जाते. रिनीव्हलची तारीख आली आहे, पुढील हप्ता अगोदरच भरला तर लवकर मॅच्युरिटी होते, त्यामुळे लवकर पैसे मिळतात, अशा थापा मारुन कोणत्या तरी मुंबई, दिल्लीस्थित खोट्या खात्यावर पैसे भरण्यास सांगितले जाते. 

लोक कसलीही खात्री न करता पैसे भरून टाकतात.   ऑनलाईन चोवीस तासांत, दोन टक्क्याने, 45 टक्के सवलतीत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून सोलापूरच्या एका वैद्यकीय प्रतिनिधीची (एमआर) 85 हजाराची, एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची साडेतीन लाखांची, एका व्यापार्‍याची अशीच  खोट्या पॉलिसीत  फसवणूक झाल्याने गुन्हे दाखल झाले आहेत.