Mon, Jun 17, 2019 04:12होमपेज › Solapur › वाळू तस्करांवर 45 दिवसांत 18 वेळा कारवाई

वाळू तस्करांवर 45 दिवसांत 18 वेळा कारवाई

Published On: Mar 16 2018 11:07PM | Last Updated: Mar 16 2018 10:29PMपंढरपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील भीमा नदीतून तसेच चंद्रभागेतून होणारा चोरटा वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाकडून फारसे प्रयत्न केले जात नाही. परंतु, उपविभागीय पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दीड महिन्यांत पंढरपूर शहर आणि तालुक्यात पोलिसांनी 18 वेळा कारवाई केली आहे. आणि तब्बल 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तरीही वाळू तस्करीचा कणा मोडला जात नाही त्यामुळे भीमा नदीतील वाळू तस्करी पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसून येते. 

नुकतेच तहसीलदार मधूसूदन बर्गे यांच्या पथकाने इसबावी आणि भटूंबरे हद्दीतील चंद्रभागेतून वाळू वाहतूक करणार्‍या 12 होड्या नष्ट केल्या आहेत.  महसूलने गेल्या काही महिन्यात केलेली सर्वात मोठी कारवाई आहे. त्याव्यतिरिक्त महसूलकडून फारशी कारवाई केल्याचे दिसून येत नाही. मात्र उपविभागीय पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनीच गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत 18 वेळा कारवाई केली आहे. या कारवाईत 7 ट्रॅक्टर, 10 टिपर व 1 जेसीबीसह 2 कोटी 11 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेवून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात वाळू तस्करीला आळा बसला आहे. तसेच गुंडगीरीलाही पायबंद बसल्याचे दिसून येत आहे. पंढरपूर शहरातील गुंडगिरीची मुख्य रसद वाळू तस्करी असल्याचे लक्षात आल्यामुळे  निखील पिंगळे यांनी अनेक वेळा  एकट्याने जाऊन कारवाई केल्याचे दिसून आले आहे.  त्यामुळे गेल्या सहा ते आठ महिन्यात शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये कमालीची घट झाली असल्याचे दिसते. वाळू तस्करांचा म्होरक्याच आता जेरबंद झाल्यामुळे पुढच्या काळात वाळू तस्करीला आणखी मोठ्या प्रमाणात पायबंद बसेल अशीही अपेक्षा व्यक्‍त होत आहे. मात्र महसूल विभागानेही पोलिसांना प्रामाणिकपणे  साथ  दिल्यास वाळू तस्करीला पूर्णपणे चाप बसेल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्‍त होत आहे.