Wed, Sep 26, 2018 14:46



होमपेज › Solapur › खानापुरात अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

खानापुरात अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

Published On: May 08 2018 10:40PM | Last Updated: May 08 2018 10:13PM



अक्‍कलकोट : वार्ताहर

खानापूर (ता. अक्‍कलकोट) येथील भीमा नदीपात्रातून 315 ब्रास अवैध वाळूसाठा त्याची अंदाजे किंमत एक कोटी 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जिल्हाधिकारी सोलापूर व पोलिस अधीक्षक ग्रामीण यांच्या आदेशाने महूसल विभाग व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्‍त विद्यमाने मोठी कारवाई झाली आहे. त्यामुळे वाळू तस्करांत एकच घबराट पसरली आहे. खानापूर भीमा नदीपात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून अवैधपणे रोज 100 ते 150 ट्रॅक्टरद्वारे वाळू तस्करी होत आहे. याबाबत संबंधित गावचे सरपंच व उपसरपंचांनी वेळोवेळी महसूल व पोलिस प्रशासनाकडे लेखी व तोंडी तक्रार केलेली होती. यावर काहीच परिणाम होत नसल्याने गावातील काही लोकांनी जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे ही हकीकत कळविली असता तत्काळ पोलिस व महसूल विभागाच्या वरिष्ठांना याबाबत कल्पना देऊन कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार तत्काळ तडवळ मंडल अधिकारी पारशे, दक्षिण पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप येळे, हेकॉ. नागेश कोणदे, नाईक नागनाथ वाकीटोळ, अशोक पाटील, संजय पांढरे यांच्यासह त्या भागातील गाव कामगार तलाठी, पोलिस पाटील, कोतवाल आदींनी याठिकाणी जाऊन पाहिले असता शेकडो वाहने नदीपात्रातून पळून गेली. दरम्यान, ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याचे आढळून आले. ती सर्व वाहने जप्त करण्यात संबंधितांना यश आले आहे.

त्यानंतर संबंधितांनी खानापूर येथील गावात फेरफटका मारला असता नदीकडे जाणार्‍या पाणंद रस्त्यालगत 8 ब्रास, जुन्या गावात हनुमान मंदिर बाजूस रोडलगत 29 ब्रास, स्मशानभूमी रोडलगत 100 ब्रास, गावठाण स्मशानभूमी रोडलगत 100 ब्रास, गावठाणातील बिराजदार यांच्या घरासमोरील मरिआई देवी मंदिराजवळ 50 ब्रास, जुन्या गावातील मराठी शाळेजवळ 20 ब्रास अशा विविध ठिकाणी मिळून तब्बल 315 ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करून पंचनामा केला आहे. याबाबतचा अहवाल मंडल  अधिकारी पारशे यांनी तहसीलदार यांना सादर केला आहे. यावरून तहसीलदार यांनी सोमवारी पारशे यांना दिलेेल्या आदेशामध्ये जप्त केलेल्या सर्व वाळूसाठ्यांचे संरक्षण महसूल व पोलिस गेल्या दोन दिवसांपासून संरक्षण करीत आहेत.