Tue, Mar 19, 2019 12:20होमपेज › Solapur › चोर सोडून संन्याशाला फाशी; संशयास्पद कारवाई

रेल्वे अधिकार्‍यांच्या बंगल्यातील जुगार अड्ड्यावर छापा; दोघांना अटक

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:47PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

शहर पोलिसांनी रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे अधिकार्‍यांच्या बंगल्यातील तसेच बसवेश्‍वरनगर तांड्यावरील जुगार अड्ड्यावर छापा मारुन दोन्ही ठिकाणांहून 2 लाख रुपयांची रोकड जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी 10 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे स्टेशनजवळील गुडलक हॉटेलसमोर असलेल्या रेल्वे अधिकार्‍यांचा बंगला नं. ई 53 येथे सुरु असलेल्या अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी छापा मारला. यावेळी जुगार खेळणार्‍या रेवणप्पा मल्लप्पा दिवटगी (वय 39, रा. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) आणि राजू बाबुराव आलाकवडे (रा. रामवाडी) या दोघांना पकडण्यात आले, तर संजय साळुंखे, सतीश कांबळे, मारुती माशाळकर हे तिघेजण पळून गेले. या जुगार अड्ड्यातून रोख 1 लाख 94 हजार रुपये, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा 1 लाख 98 हजार 160 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याबाबत रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस शिपाई संतोष चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

दुसर्‍या कारवाईत बसवेश्‍वरनगर  तांडा येथील राज रतन राठोड यांच्या घरासमोर असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारुन जुगार खेळणार्‍या चौघांना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी रोख 10 हजार 270 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याबाबत पोलिस नाईक आप्पा पवार यांच्या फिर्यादीवरुन राजू रतन राठोड (वय 40) याच्यासह चौघांविरुध्द सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस नाईक-काळे तपास करीत आहेत.

पैसे देण्यास नकार देणार्‍यास मारहाण

पैसे देण्यास नकार देणार्‍या तरुणास काचेच्या बाटलीने मारहाण करणार्‍याविरुध्द सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावड्या हत्तुरे (रा. सेटलमेंट कॉलनी नं. 2, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत अमोल नागनाथ गायकवाड (वय 24, रा. विमुक्‍त भटकी झोपडपट्टी, सोलापूर) याने फिर्याद दाखल केली आहे. अमोल गायकवाड हा त्याच्या घरासमोरील बौध्द कट्ट्यावर बसला असताना भावड्या हत्तुरे याने त्यास पैसे मागितले. त्यावेळी पैसे नाहीत, असे म्हटल्यानंतर हत्तुरेने काचेची बाटली फोडून गायकवाड याच्या डोक्यात व पाठीवर मारुन जखमी केले. हवालदार राठोड तपास करीत आहेत.

‘चोर सोडून संन्याशाला फाशी’

दोन दिवसांपूर्वी सदर बझार पोलिसांनी गुडलक हॉटेलसमोरील रेल्वेच्या मोकळ्या जागेतील जुगार अड्ड्यावर कारवाई केली होती. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकार्‍यांना जाग आली आणि त्यांनी त्यांच्या अधिकार्‍याच्या बंगल्यातील जुगार अड्ड्यावर कारवाई केली. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी कारवाई झाल्यानंतर पळून गेलेली व्यक्ती म्हणून एका ट्रकचालकाला पकडले. त्यावेळी त्या ट्रकचालकाकडे त्याच्या ट्रकच्या बिलाचे पैसे मिळून आले. त्यामुळे कारवाईत मोठी रक्‍कम मिळाल्याचे दिसून आले. ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ प्रमाणे पोलिसांनी ट्रकचालकाला पकडून त्याच्याकडील रक्‍कम जप्त दाखविल्याने याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापकाकडे तक्रार करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या कारवाईबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.