Sat, Sep 22, 2018 04:51होमपेज › Solapur › क्रूरकर्मा भावाचाही मृत्यू

क्रूरकर्मा भावाचाही मृत्यू

Published On: Jul 05 2018 1:41AM | Last Updated: Jul 04 2018 10:36PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या खांडवी (ता. बार्शी) येथील चौघांच्या जळीत हत्याकांडातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून यामुळे या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. रामचंद्र कुरूनदास देवकते (वय 31, रा. खांडवी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. तो जळीतकांडादरम्यान भाजून गंभीर जखमी झाला होता. भावाचे कुटुंब जाळल्यानंतर छोट्या भावाने पेटत्या अवस्थेत त्याला मिठी मारली होती. त्यामुळे गंभीररीत्या तो भाजला होता.

मागील शुक्रवारी मध्यरात्री खांडवी येथे सख्ख्या थोरल्या भावानेच जन्मदात्या आईसह लहान भाऊ, भावजय व पुतण्या अशा चौघांना झोपेत असतानाच अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन जिवे ठार मारले होते. राहुल कुरूनदास देवकते (वय 29), सुषमा राहुल देवकते (वय 24), आर्यन राहुल देवकते (वय 2) व कस्तुराबाई कुरूनदास देवकते (वय 65) हे या जळीतकांडामध्ये मृत पावले होते. 

दरम्यान, चौघांना पेटवून देऊन जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नात रामचंद्र हा भाजला होता. पोलिस नाईक राहुल याने पेटलेल्या अवस्थेतही रामचंद्र याला मिठी मारली होती. त्यामुळे आरोपी रामचंद्र देवकते हासुद्धा गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत राहुल, कस्तुराबाई व आरोपी रामचंद्र यांना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राहुल व कस्तुराबाई हे मोठ्या प्रमाणात भाजलेले असल्यामुळे दोघांचा यापूर्वीच मृत्यू झाला होता. आरोपी रामचंद्र याच्यावर  उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री  रामचंद्र याचादेखील मृत्यू झाला.

या हत्याकांडातील रामचंद्र हा मुख्य व एकमेव आरोपी असल्यामुळे व त्याचाच मृत्यू झाल्यामुळे हे प्रकरण पोलिस व खांडवी येथील जनतेच्यादृष्टीने संपल्यातच जमा आहे. शेतजमिनीसह संपत्तीच्या वाटणीमुळे चक्‍क आरोपीसह एकाच कुटुंबातील पाचजणांचे बळी गेले आहेत.