Thu, Jul 18, 2019 14:24होमपेज › Solapur › कंटेनरच्या धडकेत शिक्षक जागीच ठार  

कंटेनरच्या धडकेत शिक्षक जागीच ठार  

Published On: Jul 05 2018 1:41AM | Last Updated: Jul 04 2018 10:26PMसोलापूर : प्रतिनिधी

तुळजापूर रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. वेळेत कोणतीही मदत मिळत नसल्याने उपस्थित लोक संतप्त झाले होते. कंटेनरचालकाला लोकांनी बेदम मारहाण केली. उशिरापर्यंत कंटेनरचालकाविरुद्ध सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. 

संभाजी महादेव खारे (वय 53, रा. कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर) असे मृत शिक्षकाचे नाव असून नुकतीच त्यांची अक्‍कलकोट तालुक्यातील कोन्हाळी शाळेतून बदली झाली होती.  

बुधवारी दुपारच्या सुमारास कासेगाव ते सोलापूर मोटारसायकलवरून जात असताना पाचतीर दर्ग्याजवळ पाठीमागून येणार्‍या कंटेनरने धडक दिल्याने त्यात ते जागीच ठार झाले. मोटारसायकलला जोराची धडक बसल्याने ते फरफटत लांब जाऊन पडले. अपघाताची भीषणता अत्यंत विदारक होती. या अपघातानंतर रुग्णवाहिका, पोलिसांना कळवूनही लवकर मदत मिळत नसल्याचे दिसून आल्यानंतर तेथील उपस्थित लोक संतप्त झाले. तेथील उपस्थित लोकांनी मृतदेहावर कापड आणून टाकले. काही लोकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. 

कंटेनरचालकाने अपघातानंतर धूम टाकून पळून 

जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. कंटेनरची हवा सोडली. बर्‍याच कालावधीनंतर अ‍ॅम्ब्युलन्स दाखल झाली. अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे तालुका पोलिस ठाण्याचे पोहेकॉ गवळी यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच डॉक्टराने मयत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कंटेनर चालक उमेशचंद सुखविंदरसिंह यादव (वय 30, रा. उत्तरप्रदेश) यास ताब्यात घेतले. त्याच्यावर उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. शिक्षकाच्या मृत्यूमुळे अनेकांनी हळहळ व्यक्‍त केली.