Tue, Jul 23, 2019 11:48होमपेज › Solapur › डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू

डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू

Published On: Mar 11 2018 11:24PM | Last Updated: Mar 11 2018 11:03PMसोलापूर : प्रतिनिधी
 डोक्यावरुन ट्रकचे चाक गेल्याने सुरेश विनायक कोळी (वय 22, रा. शिवगंगा नगर, शेळगी, सोलापूर) हा तरुण जागीच ठार झाला. सुरेश कोळी हा रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तुळजापूर रोडवरील धोत्रेकर वस्ती येथील सर्व्हिस रोडवरून जाताना ट्रकची (क्र.के.ए.जी.सी.0882)  धडक लागल्याने तो खाली पडला व मागील चाक डोक्यावरुन गेल्याने डोके चेंदामेंदा झाले. जोडभावी पोलिस ठाण्याचे पोह. यांनी ताबडतोब सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु डोके चेंदामेंदा झाल्याने तरुणाचा जाग्यावरच मृत्यू झाला होता. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

रेल्वे अपघातामध्ये इसमाचा मृत्यू रेल्वेखाली सापडून सतीश विठ्ठल गलांडे (वय 40, रा. मुरारजी पेठ) हे मृतझाल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेटे वस्ती रेल्वेपुलाजवळ सतीश गलांडे यांचा रेल्वे अपघात झाला होता. त्यामध्ये सदर व्यक्तीस डोक्यास व मांडीस जबर मार लागून शरीरावर जबर जखमा झाल्या होत्या. रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तेथील स्थानिक नागरिकांना सतीश गलांडे जखमी अवस्थेत दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क  केला. फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोह ए.एस. शिंदे यांनी जखमी व्यक्तीस  उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु रेल्वेच्या अपघातामध्ये शरीरावर जबर जखमा झाल्याने उपचारापूर्वीच मयत झाले होते.

अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या अल्पवयीन मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तळेहिप्परगा येथे घडली आहे. रोहित भीमाशंकर कोळी(वय 17, रा. तळेहिप्परगा, उत्तर सोलापूर) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याने शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी पत्र्याच्या खोलीमधील लाकडी वाशाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने अज्ञात कारणावरुन गळफास घेतला आहे. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलाचे वडील भीमाशंकर कोळी यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेशुध्द अवस्थेत उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.