होमपेज › Solapur › मदतीच्या बहाण्याने अपघातग्रस्त तरुणीचे लाख रुपये लंपास

मदतीच्या बहाण्याने अपघातग्रस्त तरुणीचे लाख रुपये लंपास

Published On: Dec 20 2017 12:46PM | Last Updated: Dec 20 2017 12:45PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

अपघातानंतर कुणी मदतीसाठी येतो तर कुणी आपल्या हाताला अपघातग्रस्त व्यक्तीचा काही किंमती ऐवज  लागतो  का हे  पाहण्यासाठी येतो. याचाच प्रत्यय मंगळवारी दुपारी शहरातील सरस्वती चौक ते पार्क चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर  झालेल्या अपघातावेळी आला.  दुचाकी घसरुन पडल्यानंतर मदतीसाठी  आलेल्या लोकांपैकी अज्ञात व्यक्तीने तरुणीच्या पर्समधून तब्बल १ लाख रुपयांची रोकड चोरुन नेले.

याबाबत लक्ष्मी श्रीमंत भतंगे (वय २०, रा. शनि मंदीराजवळ, रेल्वे कॉलनी, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात  चोरट्याविरुध्द  फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मी भतंगे या फायनान्समध्ये नोकरी करीत असून मंगळवारी दुपारी ११ च्या सुमारास त्या त्यांच्या एमएच १३ ससीएच ६१९९ या दुचाकीवरुन सरस्वती चौकाकडून पार्क चौकाकडे जात होत्या. त्यावेळी पार्क स्टेडियमजवळ दुचाकी आल्यानंतर त्यांची दुचाकी स्लीप होऊन अपघात झाला. त्यामुळे रस्त्यावरील लोक हे मदतीसाठी धावले. या लोकांमध्ये असलेल्या चोरट्याने भतंगे यांना मदतीचा बहाणा करीत त्यांच्याकडे असलेल्या गुलाबी रंगाच्या पर्समधून रोख रक्कम चोरुन नेली. पर्समध्ये रक्कम नसल्याचे लक्षात आल्यानंतर भतंगे यांनी फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक दिवसे अधिक तपास करीत आहेत.