Fri, Apr 26, 2019 19:36होमपेज › Solapur › मडकी वस्तीजवळ अपघातात वृद्धाचा मृत्यू

मडकी वस्तीजवळ अपघातात वृद्धाचा मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर-पुणे महामार्गावरील मडकी वस्तीजवळ रस्ता ओलांडणार्‍या वृद्धास भरधाव मिनी बसने जोरदार धडक दिल्याने वृध्दाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सर्व्हिस रोड उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन पोलिस उपायुक्‍त अपर्णा गिते यांनी दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले व वाहतूक सुरळीत झाली.

भानुदास पांडुरंग वाघमारे (वय 61, रा. भोगाव, ता. उत्तर सोलापूर) असे मरण पावलेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत अनिल भानुदास वाघमारे (वय 27, रा. भोगाव) याने दिलेल्या फिर्यादीवरुन मिनी बस (क्र. एमएच 13 बी 9805) चालकाविरुध्द फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री पावणेआठच्या सुमारास भानुदास वाघमारे हे मडकी वस्ती येथे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी मिनी बस चालकाने बस भरधाव चालवून वाघमारे यांना धडक दिली. या अपघातात वाघमारे यांच्या डोक्यास मार लागून ते जागीच ठार झाले. अपघातानंतर बसचालक बस न थांबविता तसाच पळून गेल्याने चिडलेल्या या परिसरातील नागरिकांनी सोलापूर-पुणे महामार्गावर अचानकपणे रास्ता रोको आंदोलन करुन महामार्गावरील वाहतूक थांबवून ठेवली.

ही माहिती मिळताच पोलिस उपायुक्‍त अपर्णा गिते, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय जगताप, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना समजविण्याचा प्रयत्न केला. जूना पुना नाका ते बाळे या रस्त्यावर दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड करुन द्यावेत, अशी मागणी नागरिकांची होती. त्याबाबत अधिकार्‍यांनी चर्चा करुन हा सर्व्हिस रोड उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन पोलिस उपायुक्‍त गिते यांनी दिले. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करुन दिली. 

दरम्यान, याबाबत  फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक डोके तपास करीत आहेत.