Sat, Jul 20, 2019 09:30होमपेज › Solapur › ट्रकच्या धडकेत आजी-आजोबासह नात ठार 

ट्रकच्या धडकेत आजी-आजोबासह नात ठार 

Published On: Aug 03 2018 7:17PM | Last Updated: Aug 03 2018 7:17PMमोहोळ(जि. सोलापूर) :  वार्ताहर:

भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला समोरुन धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाले. सदाशीव आंबादास गुंड (वय ५८), कमल सदाशीव गुंड(वय ५०), आरती आमोल गुंड (वय, ५. सर्व रा.शिवणी उत्तर सोलापूर ) अशी अपघातात ठार झालेाल्‍यांची नावे आहेत. हा अपघात शुक्रवारी ०३ ऑगस्ट रोजी सोलापूर मंगळवेढा रोडवर इंचगाव ते बेगमपूरच्या दरम्यान घडला.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिवणी (ता. उत्तर सोलापूर) येथील सदाशीव आंबादास गुंड हे आपल्‍या मोटार सायकल (क्र. एम.एच.१३.ए.एम. ७७७६) वरुन मंगळवेढ्याच्या दिशेने चालले होते. त्यावेळी त्यांची पत्नी कमल आणि ०५ वर्षाची चिमुकली नात आरती ही त्यांच्या सोबत होती. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी इंचगाव ते बेगमपूरच्या दरम्यान आली असताना समोरुन भरधाव वेगात आलेल्‍या ट्रकने (क्र. एम.एच.२०. ए.टी. ३९००) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात ते तिघेही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. या अपघातामध्ये दुचाकीचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे. अपघातानंतर ट्रकचा चालक ट्रक जागेवरच सोडून पळून गेला. त्यामुळे सोलापूर मंगळवेढा रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. 

अपघाताची माहिती मिळताच कामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामतीच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. या प्रकरणी कामती पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ढवळे करीत आहे.