होमपेज › Solapur › वर्‍हाडाच्या टेम्पोला टँकरची धडक; 11 जण जागीच ठार

वर्‍हाडाच्या टेम्पोला टँकरची धडक; 11 जण जागीच ठार

Published On: May 13 2018 2:18AM | Last Updated: May 12 2018 10:40PMऔसा : प्रतिनिधी

विवाहासाठी निघालेल्या वर्‍हाडाच्या टेम्पोला टँकरने दिलेल्या भीषण धडकेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 18 जण जखमी झाले. अपघातातील मृत हे खरोसा (ता. औसा, जि. लातूर) येथील रहिवासी आहेत. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

याचदरम्यान मागील बाजूने येणार्‍या कारलादेखील टेम्पोची धडक बसली. सुदैवाने कारमधील प्रवाशांना  कोणतीही दुखापत झाली नाही. वर्‍हाडाच्या टेम्पोमध्ये एकूण 54  जण होते. त्यात महिला-पुरुष व  बालकांचा समावेश होता.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, औसा तालुक्यातील खरोसा येथील लक्ष्मण कोंडिबा नारंगे या तरुणाचा विवाह सोहळा मुखेड येथे होणार होता. त्यासाठी खरोसा येथून तीन टेम्पो भरून वर्‍हाड निघाले होते. जांबपासून जवळच असलेल्या मुखेड-शिरूर रोडवर आयशर टेम्पो आला असता समोरून येणार्‍या टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात 11 जण जागीच ठार, तर 18 जण जखमी झाले. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

टँकरने दिलेल्या धडकेमुळे टेम्पोतील वर्‍हाडी अक्षरश: बाहेर फेकले गेल त्यांच्याच अंगावरून टेम्पो गेल्यामुळे अपघातस्थळी अक्षरशः रक्तामांसाचा सडा पडल्यासारखे चित्र दिसत होते.
रुख्मीणबाई राजे (वय 70, रा. निटूर ता. औसा), शमा सत्तार तांबोळी (वय 38, रा. खरोसा, ता. औसा), कस्तुरबाई फुलबांगडीकर (वय 60, रा. मुरुम, ता. उमरगा), अरुणा शेषराव नांदगे (वय 45, रा. लातूर), बाळू नागनाथ किडमपल्ली (वय 70, रा. वागदरी), मंदाबाई कुंभार (वय 60, रा. मुरुम), महानंदाबाई बोडखे (वय 45, रा. खरोसा, ता. औसा),  स्नेहा सुधीर कुर्‍हाडे (वय 10, रा. ममदापूर), सुमनबाई बाळू कुंभार (वय 65, रा. वागदरी), टेम्पोचालक तुकाराम बागले (वय 36, रा. मुरंबी, ता. चाकूर) अशी  मृतांची नावे आहेत.

जखमी रुणांना जळकोट ग्रामीण रुग्णालयात, तर काहींना मुखेड (जि. नांदेड) येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले आहे. या विचित्र अपघातात आयशरची केबिन चक्काचूर झाली असून अपघात केबिनमधील आठजणांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मुखेड, जळकोट, बार्‍हाळी, जांब येथील रुग्णवाहिका तसेच मुखेड व जांब येथील उपसहाय्यक गणपत गिते व मुखेड येथील पोलिस निरीक्षक संजय चोबे, जळकोट येथील पोलिस निरीक्षक पटेल, गावातील नागरिक सूर्यकांत मोरे, हिप्परगेकर, बाळासाहेब पुंडे, मनोज गौंड आदी मंडळींनी जखमींना उपचारासाठी तातडीने रवाना केले.

जांबवासिय धावले मदतीला 
सकाळी 9 वाजता अपघाताची घटना घडल्यानंतर घटनास्थळापासून काही अंतरावर राहात असलेल्या श्रीकांत मोरे यांनी दुर्घटनेची माहिती आपल्या मित्रांना कळवली. त्यानंतर सूर्यकांत मोरे, हिप्परगेकर, विष्णू जामकर, पांडुरंग मोरे यांच्यासह अनेकजण अपघातातील जखमींच्या मदतीसाठी धावले. जवळपास 10.30 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी मुखेड, जळकोट आणि जांब या तीन ठिकाणच्या रुग्णवाहिका दाखल झाल्या. त्यानंतर जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुपारी साधेपणाने लग्न
या अपघातामुळे लग्न सोहळ्याच्या आनंदावर विरजण पडले. यंदाच्या वर्षीची शेवटची लग्नतिथी शनिवार, 12 मे रोजी होती. त्यानंतर अधिक मास असल्याने तिथी नाही. त्यामुळे दोन्हीकडील मंडळींनी साधेपणाने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह लावला.